शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन
पोलिसांचा लाठीचार्ज
। मुंबई । वृत्तसंस्था ।
दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षांना विद्यार्थ्यांकडून विरोध होताना दिसत आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद, पुणे आणि अकोल्यासह काही ठिकाणी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्य सरकारसमोर आव्हान निर्माण होणार असल्याची शक्यता आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे, नागपुरसह अन्य काही शहरांत गर्दी केली.
सोमवारी मुंबईत विविध भागातून विद्यार्थी धारावीत जमले व त्यांनी आंदोलनास सुरूवात केली. पोलीस प्रशासन या विद्यार्थ्यांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र विद्यार्थ्यांची संख्या जास्त असून, विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नसल्याने, पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आहे. तसेच अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच विद्यार्थी एकतेच्या घोषणा देत परिसर दणाणून गेला होता. शाळा जर ऑफलाईन असत्या तर परीक्षा ऑफलाईन घरण्यास हरकत नाही. मात्र, ऑनलाइन शाळा घेऊन ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांना पटलेला नाही. परीक्षासंदर्भात बैठक घेताना शिक्षण मंत्री या ऑफलाईन बैठकीला उपस्थित न राहता ऑनलाइन उपस्थित होत्या. ऑफलाइन परीक्षेचा निर्णय ऑनलाइन बैठकीत कसा घेता, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
परीक्षा घेत असताना आम्ही सर्व बाबींचा विचार करत आहोत. संघटनांनी मुलांना रस्त्यावर आणणे योग्य नाही. काही गोष्टी बोलायच्य असतील तर ते आमच्याशी चर्चा करू शकतात. आम्ही चर्चा करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. त्यानुसार आम्ही शिक्षण तज्ज्ञांशी देखील चर्चा करू. विद्यार्थ्यांच्या काही सूचना असतील तर त्या ऐकण्यासाठी सरकार व शिक्षण विभाग तयार आहे. – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री