। पाताळगंगा । वार्ताहर ।
शाळेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा, शिवाय कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रिय खत वापर करुन मुलांच्या आहारात नित्यनेमाणे भाजीपाला असावा, या उद्दात विचारांतून परसबागेत भेंडी, भोपळा, अळू, वांगी, मिर्ची, घेवडा, टॉमेटो इत्यादी विविध भाज्यांची लागवड करण्यात आली. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत खालापूर तालुक्यातील ‘उत्कृष्ट परसबाग’ म्हणून रायगड राजिप शाळा तळवली या शाळेने तालुकास्तरीय तृतीय क्रमांक मिळविला आहे.
आज मराठी शाळा कुठेही कमी नाही. शिवाय त्या आता डिजिटल होत चालल्या असून विद्यार्थ्यांना घडविण्याचे मोलाचे योगदान शिक्षक वर्ग करीत आहेत. त्यांच्या आरोग्यविषयी काळजी घेतली जाते. यामुळे शाळेमधून निघणारा ओला व सुका कचरा वेगळा करून या कचऱ्यापासून गांडूळ खत उपक्रम हाती घेवून परसबागेची निर्मिती करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना रोजच्या जेवणात पालेभाज्यांचा आहार मिळत आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी चोरामले, पोषण आहार अधिक्षक दिपा परब, माजगाव केंद्राचे केंद्रप्रमुख जे.पी.परदेशी यांनी येथील शाळेचे कौतुक केले. परसबाग निर्मितीसाठी मुख्याध्यापिका मंगल मुंढे, शिक्षक मस्तान बोरगे यांनी मोठे योगदान दिले. तर, तृतीय क्रमांक प्राप्त झाल्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.