जे.एस.एम. महाविद्यालयात राज्यस्तरीय वेबिनार संपन्न
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
बदलत्या काळानुसार काळाची गरज म्हणून नवे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजे. हे तंत्रज्ञान स्वीकारत असताना सर्वात मोठी अडचण भारतीय समाजातील वर्गीय स्तरीकरण ही आहे. निम्न स्तरापर्यंत हे तंत्रज्ञान पोहचायचे असेल तर शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठा बदल करावा लागेल. सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान सरकारने निःशुल्क आणि स्वस्तात पोहचविले पाहीजे अन्यथा प्रगत आणि अप्रगत समाजात या अनुषंगाने मोठी दरी निर्माण होण्याची शक्यता आहे असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुख डॉ. वंदना महाजन यांनी केले. जे. एस. एम. महाविद्यालय, अलिबाग येथील मराठी विभाग व आयक्यूएसीतर्फे मराठी भाषा व आधुनिक तंत्रज्ञानफ या विषयावरील राज्यस्तरीय वेबिनारच्या उद्घाटक म्हणून त्या उपस्थित होत्या.
पदवी व पदव्युत्तर स्तरावर मराठीचे अध्ययन करणारे विद्यार्थी व अध्यापन करणारे शिक्षक-प्राध्यापक तसेच मराठीतून लेखन करू इच्छिणारे व मोबाईल, टॅब, संगणक, लॅपटॉप यासारख्या साधनांमध्ये मराठी भाषेचा व देवनागरी लिपीचा वापर करू इच्छिणारे यांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने दोन दिवसीय राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन शुक्रवार व शनिवारी झूम व यु-ट्यूबवर करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अॅड. गौतम पाटील, अध्यक्ष, जनता शिक्षण मंडळ, अलिबाग हे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. अनिल पाटील यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख मा. डॉ. नीळकंठ शेरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या वेबिनारमध्ये विकीपीडीयासाठी लेखन विकास कांबळे, युनिकोड टंकलेखन, व्हॉईस टायपिंग, गुगल लेन्स डॉ. निधी पटवर्धन, ब्लॉगलेखन डॉ. सुधीर देवरे, पॉवरपॉईंट निर्मिती, ईमेल लेखन, स्पीच टू टेक्स्ट, टेक्स्ट टू स्पीच प्रा. प्रमोद पवार, वृत्तपत्र माध्यमात मराठी भाषेचा वापर-पुस्तक परीक्षण लेखन डॉ. सतीश मस्के, दूरचित्रवाणी माध्यमात मराठी भाषेचा वापर-चित्रपट व मालिकांसाठी संवाद लेखन डॉ. अनिल सपकाळ या विषयांवर तज्ज्ञ वक्त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.