। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
युरोपियन विजेता इटलीचा संघ सलग दुसर्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला मुकणार आहे. पालेर्मो येथे नॉर्थ मॅसेडोनियाकडून पत्करलेल्या 0-1 अशा अनपेक्षित पराभवामुळे इटलीचे स्वप्न धुळीस मिळाले. भरपाई वेळेत अॅलेक्सांडर ट्रॅजकोव्हस्कीने नोंदवलेल्या निर्णायक गोलमुळे मॅसेडोनियाने विश्वचषक पात्रता स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.
गतवर्षी जुलैमध्ये युरो-2020चे जेतेपद पटकावणार्या इटलीच्या संघाने 32 वेळा गोलजाळयाच्या दिशेने केलेले प्रयत्न अपयशी ठरले. त्या तुलनेत मॅसेडोनियाने फक्त चार केले. पण यापैकी अॅलेक्सांडरचा प्रयत्न यशस्वी ठरला. म्हणजेच या एकंदर सामन्यात इटलीचे पूर्णत: वर्चस्व होते. परंतु मॅसेडोनियाचा गोलरक्षक स्टोल दिमित्रिव्हस्कीने ते हाणून पाडले.
सामना संपल्याची शिटी वाजली आणि पाच वर्षांआधीची पुनरावृत्ती झाली. नैराश्येच्या गर्तेतील इटलीचे खेळाडू मैदानावरच ओक्साबोक्शी रडू लागले. दुसरीकडे, मॅसेडोनियाचा जल्लोष अविरत सुरू होता.
पोर्तुगालचा विजय
पोर्टो : पोर्तुगालने गुरुवारी तुर्कीवर 3-1 असा दिमाखदार विजय मिळवत विश्वचषक पात्रतेच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. आता मंगळवारी पोर्तुगालची गाठ नॉर्थ मासेडोनिया संघाशी पाडणार आहे. या सामन्यातील विजयी संघ कतारच्या विश्वचषकासाठी पात्र ठरेल. 37 वर्षीय रोनाल्डो कारकीर्दीतील सलग चौथ्या विश्वचषकात खेळण्यासाठी उत्सुक आहे.
उरुग्वे, इक्वाडोर पात्र
साओ पावलो : ब्राझील आणि अर्जेटिनापाठोपाठ उरुग्वे आणि इक्वाडोर संघ दक्षिण अमेरिकेतून विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. गुरुवारी इक्वाडोरने पॅराग्वेकडून 1-3 अशी हार पत्करली, तर उरुग्वेने पेरू संघाला 1-0 असे हरवले. परंतु गुणतालिकेत अनुक्रमे इक्वाडोर आणि उरुग्वे यांनी अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान पटकावत विश्वचषकासाठी थेट प्रवेश मिळवला.