विद्यार्थी बनणार ‌‘ग्रीन सर्जन‌’

दुष्काळावर मात करण्यासाठी लोकचळवळ; गांधारी नदी खोऱ्यात जलसंवर्धनाचा जागर

| महाड | प्रतिनिधी |

गांधारी नदी खोऱ्यात यंदा केवळ 80 टक्के पाऊस झाल्याच्या पार्श्वभूमीवर, संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंवर्धनाची एक मोठी लोकचळवळ उभी करण्यात येत आहे. या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‌‘गांधारी नदी परिक्रमा, संवाद यात्रा‌’ची सांगता सोमवारी (दि.26) मोहोप्रे येथील रायगड कॉलेज ऑफ फार्मसी येथे उत्साहात पार पडली.

हिरवळ प्रतिष्ठान, महाड यांच्या पुढाकाराने आणि ग्राम विकास केंद्र नाते, रायगड शैक्षणिक संकुल तसेच विविध ग्रामपंचायतींच्या सहकाऱ्याने दि.20 ते 25 ऑक्टोबरदरम्यान या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या 6 दिवसांच्या प्रवासात ग्रामस्थ, युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये जलसंवर्धनाबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. पूनाडे (कोंडरान) येथून सुरू झालेली ही यात्रा कोंझर, कोथुर्डे, खर्डी, चापगाव, तळोशी, नांदगाव बुद्रुक, नाते, कोकरे, घुरूप कोंड, पारवाडी, आचळोली या गावांतून मार्गक्रमण करत मोहोप्रे येथे पोहोचली. या यात्रेचे नेतृत्व जलनायक किशोर धारिया यांनी केले.

यात्रेदरम्यान पाणी बचत, पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविणे, वनराई बंधारे, कोकण विजय बंधारे आणि विशेषतः आदिवासी बांधवांनी त्यांचे पारंपरिक पद्धतीने बांधलेले साटी बंधारे, भूजल पुनर्भरण, तसेच विहिरी, झरे, तलाव आणि नदीचे संवर्धन यांसारख्या महत्त्वाच्या उपाययोजनांवर ग्रामस्थांशी थेट संवाद साधण्यात आला. ग्रामस्थांनी आपल्या भागातील स्थानिक पाणीसमस्या मांडत जलसंवर्धनासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, इतकेच नव्हे तर विविध गावांमध्ये प्रत्यक्ष श्रमदानालाही सुरुवात झाली आहे.

निसर्गसंवर्धनासाठी कार्य करण्याची शपथ
यात्रेच्या सांगता सोहळ्यात अनेक शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नदी व निसर्गसंवर्धनासाठी ‌‘ग्रीन सर्जन‌’ म्हणून कार्य करण्याची शपथ घेतली. नदीच्या आरोग्याला बाधा आणणाऱ्या समस्या ओळखून त्यावर उपाययोजना करणे, प्रदूषण रोखणे आणि जलसंवर्धनाच्या कामांत सक्रिय सहभागी होणे, हा या संकल्पनेचा मुख्य उद्देश आहे. “करा पूर्वतयारी, जी दुष्काळ निवारी; माझी नदी आहे, माझी जबाबदारी!” या मुख्य संदेशातून जलसंवर्धनासाठी लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. ग्रामस्थांचे श्रमदान, विविध संस्थांचे सहकार्य आणि युवकांचा ऊर्जेचा वापर करून गांधारी नदी खोऱ्यात जलसंवर्धनाची लोकचळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
Exit mobile version