| नेरळ | वार्ताहर |
कर्जत एज्युकेशन सोसायटी संचालित इंग्लिश मिडीयम स्कूल ही शाळा नेहमीच प्रयोगशील शिक्षणात अग्रेसर आहे. मी देखील याच शाळेचा माजी विद्यार्थी असून त्यावेळी जिल्हा आणि तालुकास्तरावर विज्ञान प्रदर्शन व्हायचं. त्यामुळे सर्वांना वाव मिळत नव्हता. मात्र, आज केईएस शाळेने स्थानिक पातळीवर भरावलेल्या विज्ञान प्रदर्शनामुळे शाळेतील 44 विद्यार्थ्यांना त्यांच्यातील सुप्त गुण प्रदर्शित करता आले. त्यामुळे असेच प्रोत्साहन विद्यार्थ्यांना मिळाल्यास भविष्यात यातील अनेक यशस्वी शास्त्रज्ञ घडतील असे प्रतिपादन कर्जत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी कर्जत येथे केले. केईएस शाळेच्या विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.
भारतरत्न डॉ.सी.वी. रमण यांच्या जयंतनिमित्त राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधत कर्जत शहरातील कर्जत एज्युकेशन सोसायटी संचालित इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने शाळेत विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. यावेळी कर्जत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अनिरुद्ध जोशी, सचिव प्रवीण गांगल, खजिनदार मदन परमार, कार्यकारणी सदस्य सतीश पिंपरे, राजेश भुतकर, व्यवस्थापनाचे सुनील जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते सकाळी विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. तर या विज्ञान प्रदर्शनात शाळेतील एकूण 44 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध प्रकल्प सादर केले होते. यामध्ये राम मंदिर सुरक्षा, चांद्रयान, वातावरणीय बदल, बायोगॅस, रोबो, पवनचक्की, पोली हाऊस, सोलर एनर्जी, पॉवर हाऊस, ठिंबक सिंचन, विद्युत निर्माण, आदी प्रकल्प सादर केले. तर या प्रकल्पांचे महत्व देखील भेट देणार्या पालक व मान्यवरांना विशद केले. तर कार्यकारिणी सदस्य सतीश पिंपरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि कर्जतमधील अनेक मुले आज शास्त्रज्ञ म्हणून देशाचे नाव उज्वल करत आहेत. माझा मुलगा देखील डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करतोय तेव्हा विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यास आणि इच्छाशक्ती ठेवावी. ठरवलं तर शास्त्रज्ञ होणं मोठी गोष्ट नाही, असे मार्गदर्शन केले.
यावेळी केईएम शाळेच्या मुख्याध्यापिका अनुपमा चौधरी, पर्यवेक्षक सुनील बोरसे, विज्ञान शिक्षिका हेमा जोशी, नीता वडकर, ऐलेन बिस्ट, रविंद्र राऊत, पर्यवेक्षिका संपदा भोगले यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.