विद्यार्थ्यांना मिळणार आकाशातून शिक्षण
| रायगड | आविष्कार देसाई |
विद्यार्थ्यांचे शिक्षण सुलभ व्हावे, तसेच त्यांना चौफेर ज्ञान मिळावे यासाठी सरकारी पातळीवर विविध प्रयोग केले जात आहेत. त्यातीलच एक म्हणजे पीएम विद्या हे चॅनेल केंद्र सरकारमार्फत विकसित केले जात आहे. जीसॅट-15 उपग्रहामार्फत या चॅनेलचे कार्य चालणार आहे. त्यामुळे तळागाळातील मुलांना घरबसल्या शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. रायगड जिल्ह्यातील तब्बल 48 तंत्रस्नेही शिक्षक या उपक्रमाचा भाग असून, पाठ्यपुस्तकांमधील अध्ययन निष्पत्तीवर आधारित पाठ तयार करत आहेत. यासंदर्भातील 83 व्हिडीओंचे रेकॉर्डींग पनवेल येथील स्टुडिओमध्ये सुरु आहे.
पीएम ई विद्या नावाचा सर्वसमावेशक उपक्रम सरकारने सुरु केला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या आदेशानुसार स्टार्स उपक्रम 2024-25 अंतर्गत पीएम विद्या चॅनलसाठी ई-साहित्य निर्मिती करण्यात येत आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल, जि. रायगड (डाएट पनवेल) यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिक्षक सहभागी झाले आहेत.
इयत्ता 6 वी आणि 7 वी मराठी माध्यमाच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील घटकावर एकूण 83 व्हिडीओ तयार करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्य तसेच अन्य सर्व प्रकारच्या शाळेतील मराठी शिकविणारे शिक्षक यात सहभागी झाले आहेत. सदर कामाच्या अनुषंगाने गुगल फॉर्ममार्फत उपलब्ध झालेल्या शिक्षकांपैकी संबंधित शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. सदर निवड झालेल्या शिक्षकांचे प्रशिक्षण जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल येथे प्राचार्य डॉ. आय.ए. इनामदार व वरिष्ठ अधिव्याख्याता सागर तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. शैक्षणिक व्हिडिओ तयार करण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांना प्रेझेंटेशन तयार करणे, स्क्रिप्ट लिहिणे आणि व्हिडिओ शूटिंगवेळी विषयाची उत्कृष्ट मांडणी करता येण्यासाठी याचे ज्ञान असणे गरजेचे होते. याकरिता शिक्षकांनी विविध माध्यमातून याची माहिती मिळवली व घेतलेल्या प्रशिक्षणाचे उपयोग करून या व्हिडिओ निर्मितीचे काम सुरू केले आहे. त्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी पनवेल येथील रेकॉर्डिंग स्टुडिओचे वृषभ जले हे सरकारच्यावतीने काम पाहात आहेत, असे या उपक्रमातील सहभागी तंत्रस्नेही व तज्ज्ञ शिक्षक संदीप वारगे यांनी ‘कृषीवल’शी बोलताना सांगितले.
मागील काळात कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे सर्वच शाळा बंद झाल्या होत्या आणि शिक्षण वार्यावर होते. त्याचा बोध घेऊन सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे. राष्ट्रीय पातळीवर पीएमई विद्या चॅनल सुरू करून त्याचे प्रक्षेपण राष्ट्रीय वाहिन्यांद्वारे करण्यात येणार आहे. पुन्हा अशी परिस्थिती आली तर शासनाने त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी उचललेले हे पाऊल आहे, असे म्हटले जाते. जरी अशी परिस्थिती उद्भवली नाही, तरी या उपक्रमामुळे विद्यार्थी घरबसल्यासुद्धा शिकू शकणार आहेत. तज्ज्ञ शिक्षकांचे पाठ विद्यार्थ्यांना घरबसल्या मिळाल्यामुळे अधिकचे मार्गदर्शन होणार आहे. त्याचसोबत वर्ग अध्यापन करणार्या शिक्षकांनासुद्धा या तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या पाठाचा उपयोग होणार आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये इयत्ता सहावी व सातवीच्या मराठी विषयांचे व्हिडिओ करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे पाठ तयार करताना त्या घटकामधील अध्ययन निष्पत्तीचा प्रामुख्याने विचार केल्यामुळे गुणवत्तापूर्ण पाठ सर्वांना अनुभवण्यास मिळणार आहेत. या शिक्षकांना राजेंद्र अंबिके, सविता अष्टेकर आणि संदीप वारगे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
पीएम ई विद्याचे फायदे-
शिक्षणासाठी डिजिटल, ऑनलाइन, ऑन-एअर अभ्यास सुरु राहील.
प्रति वर्ग 1 ते 12 पर्यंत एक नियोजित टीव्ही चॅनेल असेल.
दीक्षा अॅप : शासनाने नॉलेज शेअरिंगसाठी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून दीक्षा अॅपची निर्मिती केली आहे. हा अॅप मोबाईलच्या प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. याचा वापर लाखो विद्यार्थी करत आहेत.
शालेय आणि उच्च शिक्षणासाठी एमओओसीएस स्वरूपात स्वयम ऑनलाइन अभ्यासक्रम वापरात आहे. तिथेही हे व्हिडिओ उपलब्ध असणार आहेत.
रेडिओ, कम्युनिटी रेडिओ आणि शिक्षा वाणी वर पॉडकास्ट होणार आहेत.दृष्टिहीन आणि श्रवणदोषांसाठी विशेष ई-सामुग्रीसुद्धा या माध्यमातून मिळणार आहे.