आशिष शेलार यांची रायगड संपर्कमंत्रीपदी नेमणूक
| आविष्कार देसाई | रायगड |
घटक पक्षांना चेकमेट देण्यासाठी भाजपाने सत्तेच्या सारीपाटावर जिल्ह्यात संपर्कमंत्री पदाच्या सोंगट्या फेकल्या आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये भाजपाचा पालकमंत्री नाही, तेथे भाजपाने अशी खेळी केली आहे. विशेष म्हणजे, रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नसताना याठिकाणी आशिष शेलार या आक्रमक नेत्याची नियुक्ती करत भाजपाने घटक पक्षांना थेट आव्हान दिल्याचे दिसून येते. शत-प्रतिशत भाजपा असा नारा दिल्लीश्वरांनी दिला आहे. त्यामुळे आगामी कालावधीत भाजपाला सोबत करणार्यांची तसेच अन्य राजकीय पक्षांची जागा नेमकी कोठे असेल, याचा अंदाज आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही.
गेल्या काही वर्षांमध्ये भाजपाने धीम्यागतीने रायगडमध्ये हातपाय पसरवण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते. यासाठी भाजापाने तोडा-फोडाचे राजकारण करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँदग्रेस, शेकाप, शिवसेना अशा प्रस्थापित राजकीय पक्षातील मातब्बर नेत्यांना आपले केले आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे, रायगडमध्ये भाजपचे पहिले आमदार म्हणून प्रशांत ठाकूर पनवेलमधून निवडून आले. सध्या पेणमध्ये रवींद्र पाटील आणि उरणचे महेश बालदी असे भाजपचे तीन आमदार सध्या रायगड जिल्ह्यात आहेत. शिवाय, शेकापमधून फोडलेल्या धैर्यशील पाटील यांनाही भाजपने राज्यसभेवर पाठवले आहे. त्यातच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचे पुत्र विक्रांत पाटील यांची विधानपरिषदेवर नियुक्ती केली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत प्रवेश केला आहे.
भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे गेल्या दहा वर्षांत रायगड जिल्ह्यात संपर्क वाढवण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यांनी जिल्ह्यात उत्तम प्रकारे संघटनात्नक बांधणी केल्याचे दिसून येते. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती दिल्याने महायुती सरकारवर जबरदस्त नामुष्की ओढवली होती. महिना होत आला तरी, अद्याप रायगड जिल्ह्याला पालकमंत्री देण्यात आलेला नाही. यावरून महायुतीमध्ये पालकमंत्रीपदाचा वाद किती विकोपाला गेला आहे, हे आपल्याला सहज लक्षात येते. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पालकमंत्रीपदावरुन भांडत आहेत. तर, दुसरीकडे भाजपाने यांना चेकमेट देण्यासाठी आशिष शेलार यांची संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. रायगड जिल्ह्यावर आमचीही नजर राहणार असल्याचा संदेशच जणू महायुतीमधील घटक पक्षांना दिला आहे.
आशिष शेलार हे आक्रमक आणि अभ्यासू नेते आहेत. त्यांच्या माध्यमातून आता अन्य पक्षातील नेत्यांना चुचकारण्याचा प्रयत्न आगामी काळात झाल्यास कोणालाही नवल वाटायला नको. भाजपाने शत-प्रतिशत भाजपा असा नारा आहे. त्यामुळे आगामी 2029 च्या निवडणुकीत भाजपा एकला चलो रेचा नारा देऊ शकतो. यासाठी सर्व आघाड्यांवर भाजपाचे नेते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भाजपाची ही खेळी त्यांच्या घडक पक्षांना आगामी काळात नक्कीच परवडणारी नाही. भाजपाची पडणारी पावले वेळीच ओळखून घटक पक्षांनी सतर्क होणे गरजेचे आहे. अन्यथा भाजपा नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही, हे ध्यानात घ्यावे.