लोधिवलीत सबज्युनियर मुलांची क्रिकेट निवड चाचणी

| रसायनी | वार्ताहर |

वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागातील लोधिवली येथे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे सबज्युनियर (16 वर्षांखालील) मुलांची क्रिकेट निवड चाचणी 8 व 9 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे.

रिलायन्स टाऊनशिप मैदान, लोधीवली येथे ही निवड चाचणी होणार आहे. या निवड चाचणीतून रायगड जिल्ह्याचा 16 वर्षांखालील मुलांचा संघ निवडला जाणार आहे. हा संघ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या 16 वर्षाखालील मुलांच्या आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत सहभागी होईल. 1 सप्टेंबर 2007 ते 31 ऑगस्ट 2009  या कलावधीत जन्मलेले रायगड जिल्ह्यातील खेळाडू या निवड चाचणीसाठी पात्र असतील. प्रत्येक खेळाडूसाठी निवड चाचणी फी 200 रुपये आकारण्यात येणार आहे.

खेळाडूंनी आपल्या स्वतःच्या सहीने साक्षांकित केलेली आधार कार्डची झेरॉक्स प्रत व मूळ आधार कार्ड, स्वतःचे दोन रंगीत पासपोर्ट साईज फोटो व जन्मतारखेचा दाखला  सोबत आणणे आवश्यक आहे. खेळाडूंनी स्वतःच्या क्रिकेटकिटसह व पांढर्‍या पोशाखात निवड चाचणीच्या ठिकाणी सकाळी 8 वाजता उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी प्रशांत ओक 9822422676, प्रीतम कय्या 9322243534, प्रकाश पावसकर 7977012741 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी केले आहे.

Exit mobile version