। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
नुकत्याच लागलेल्या निकालात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी अलिबाग तालुक्यातील कार्ले गावातील स्वरुपा संदीप पाटील हिची पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मैदानी चाचणी आणि मुलाखत असे टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करत या पदावर निवड झाली आहे.
स्वरुपा पाटील हिने दहावी उत्तीर्ण झाल्यावर डी वाय पाटील मधून तीन वर्षाचा इलेक्ट्रॉनिक इंजिनियरिंग चा डिप्लोमा यशस्वी पणे पूर्ण केला. त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मधून राज्यशास्त्र विभागाची पदवी प्राप्त केली. 2016 पासून एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. 2017 पासून वेगवेगळ्या परीक्षा देण्यास तिने सुरूवात केली. मला पोलीस उपनिरीक्षक च व्हायचे असे आपण काही ठरवले नव्हते पण सरकारी नोकरीसाठी एमपीएससी परीक्षा द्यायचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पुढील परीक्षांचा देखील आपण अभ्यास करत असल्याचे स्वरुपा ने सांगितले. भविष्यात आपल्याला उपजिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची इच्छा आहे. या परीक्षेसाठी माझा मामा ॲड महेश घरत तसेच आई बाबा व भाऊ यांचे मार्गदर्शन लाभले असेही तिने सांगितले. 2017 पासून परीक्षा देणाऱ्या स्वरूपाला एक दोन मार्क्सने यश हुलकावणी देत होते. मात्र. 2019 मध्ये दिलेल्या परीक्षेत तिला यश मिळाले. कोरोना मुळे या परीक्षेचा निकाल दोन वर्षानंतर लागला असेही तिने सांगितले. वडील कस्टम विभागाच्या सरकारी नोकरीतून निवृत्त झाले असून आई गृहिणी आहे भाऊ कोर्टात सेवा करत असल्याचे स्वरूपाने सांगितले. जून महिन्यात तिचा प्रशिक्षण सुरू होणार असल्याचे ती म्हणाली.