भारतीय रेल्वेची हॅट्रिक हुकली, महाराष्ट्राच्या महिला उपउपांत्य फेरीतच गारद
। मुंबई । प्रतिनिधी ।
हिमाचल प्रदेशने भारतीय रेल्वेचे आव्हान 33-31 असे परतवून लावत राष्ट्रीय स्पर्धेच्या इतिहासात दुसर्यांदा विजेतेपदाचा मान पटकाविला. तेलंगणा राज्य कबड्डी असो. वतीने हैदराबाद येथे 2017-18 या मोसमात झालेल्या 65 व्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी पहिल्यांदा अंतिम फेरीत धडक देत विजेतेपद मिळविले होते. यंदा 68व्या राष्ट्रीय स्पर्धेत ते दुसर्यांदा अंतिम फेरीत धडकले आणि दुसर्यांदा देखील विजेतेपदाची किमया साधली. चरखी-दादरी- हरियाणा येथे झालेल्या अंतिम सांमन्यात जोरदार सुरवात करीत हिमाचलने रेल्वेवर पहिला लोण दिला आणि आघाडी मिळविली. विश्रांतीला 16-09 अशी आघाडी हिमाचल कडे होती. उत्तरार्धात मात्र रेल्वेच्या खेळाडूंना सूर सापडला. त्यांनी जोरदार प्रतिकार करीत 22 गुणांची कमाई केली. पण लोण काही मात्र ते हिमाचलवर देऊ शकले नाहीत त्यामुळे विजय रेल्वेपासून दूरच राहिला.
रात्री उशीरा झालेल्या उप उपांत्य महाराष्ट्राला हिमाचलकडून 21-27 असे 6 गुणांनी पराभूत व्हावे लागले. या पराभवाने महाराष्ट्राचे राष्ट्रीय स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दमदार सुरुवात करीत महाराष्ट्राने पहिल्या डावात सातत्याने आपल्याकडे आघाडी राखली होती. मध्यांताराला 11-10 अशी महाराष्ट्राकडे आघाडी होती. दुसर्या डावातील पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ महाराष्ट्राकडे आघाडी होती. पण कारण नसताना दुसर्या चढाईत सायली केरीपाळेची झालेली अव्वल पकड महाराष्ट्राला पराभवाच्या गर्तेत घेऊन गेली. ही पकड करीतच हिमाचलने 1 गुणाची आघाडी घेतली. येथूनच महाराष्ट्राच्या हातून सामना निसटला. हिमाचलने महाराष्ट्रावर लोण देत ही आघाडी आणखी वाढवीत 6 गुणांनी सामना जिंकला.