जनतेच्या विश्‍वासामुळेच राजकारणात यशस्वी – पंडित पाटील

। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।

स्व. भाई प्रभाकर पाटील व कार्यकर्त्यांनी काम करण्याची संधी दिली. मी स्वतः आमदार नाही, आमचा पक्ष सत्तेत नाही. परंतु, रायगड जिल्ह्यातील तमाम लोकांचा विश्‍वास आजही शेतकरी कामगार पक्षावर आहे. माझ्या वडिलांनी मला कानमंत्र दिला होता, की जोपर्यंत तुम्ही जनतेचा विश्‍वास संपादन करीत नाही, तोपर्यंत तुम्हाला राजकारणात यश संपादन होत नाही. आज मी इथे आहे, ते वडिलांच्या कानमंत्रामुळेच. श्रीवर्धन तालुका म्हटले की, काँग्रेसचे रवींद्र राऊत व कुणबी समाजाचे नेते ग.स. कातकर यांची नावं घेणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन पंडित पाटील यांनी केले.

मिटकरी येथे पंधरा लाखांच्या निधीतून मिटकरी देवी सभामंडप भूमीपूजन समारंभ बुधवारी (दि.28) सायंकाळी सहा वाजता शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

मिटकरी येथील जुन्या आठवणींना उजाळा देताना पंडित पाटील सांगितले की, आणीबाणीनंतर प्रभाकर पाटील यांनी मिटकरीपासून जुने तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चात या विभागातील नागरिकांचा चांगला सहभाग होता. या तालुक्यात प्रभाकर पाटील व ग.स. कातकर यांनी भरीव कामगिरी केली आहे.

पनवेल-इंदापूर महामार्गावरील खड्डेमय रस्त्यांच्या बाबतीत नाराजी व्यक्त करताना पंडित पाटील म्हणाले की, नागपूर-मुंबई, नागपूर-पणजी येथे जाण्यासाठी शेकडो रस्ते आहेत. आणखीन कोट्यवधी रुपये खर्च करुन हे रस्ते पाचपदरी कशासाठी? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था का आहे? रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा जिल्हा होते. परंतु, कुलाब्याचे रायगड जिल्हा नामकरण झाले हे श्रेय बॅरिस्टर ए.आर. अंतुले व स्वर्गीय प्रभाकर पाटील यांचे आहे.

मिटकरी येथे स्मशानभूमी नसल्यामुळे या परिसरात व्यक्ती मृत झाल्यास श्रीवर्धन येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करावे लागतात. हे अंतर चार किलोमीटरचे असल्याने स्थानिकांना त्रासदायक ठरत आहे. स्थानिकांनी ही व्यथा पंडित पाटील यांच्यासमोर मांडली. मिटकरी परिसरातील सरकारी जागेत स्वतंत्र स्मशानभूमी बांधून देण्याचे शब्द पाटील यांनी स्थानिकांना दिला.

यावेळी कार्यक्रमास तालुका सरचिटणीस वसंत यादव, विभागीय चिटणीस दिलीप कांबळे, गोंडघर माजी सरपंच स्वप्नील बिराडी, प्रमोद नाक्ती, अखलाक माहिमकर, नामदेव चव्हाण हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक पोटफोडे यांनी केले.

Exit mobile version