खैर तस्करी रोखण्यात यश

। मुंबई । प्रतिनिधी ।

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील टेन नाका येथे केलेल्या कारवाईत खैराची तस्करी करणारा ट्रक जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे तीन वाजता सापळा रचून केलेल्या कारवाईत दहा लाख रुपये किंमत असलेले खैराचे सोलीव ओंकडे जप्त करण्यात आले आहेत. कारवाईत 25 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अज्ञात ट्रक चालकाविरोधात वन अधिनियम 1927 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षता पथकाने नाशिक विभागाला खैर तस्करी बाबत दिलेल्या माहितीनुसार नाशिकमध्ये कारवाई करून दुसरा ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे.

जव्हार उपवन संरक्षक कार्यालया अंतर्गत वाडा दक्षता पथकाने गुरुवारी पहाटे महामार्गावरील टेन नाका येथे सापळा रचला होता. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास खैर तस्करी प्रकरणी संशयीत एक ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला असता ट्रक चालक ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. ट्रकजवळ पोहोचलेल्या वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये खैराचे सोलीव ओंडके आढळून आल्याने खैराचे सोळीव ओंडके आणि ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाई जव्हार विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. सैपुन शेख, ठाणे वनवृत्ताचे विभागिय वनअधिकारी तथा दक्षता पथक प्रभारी प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनात वाडा दक्षता पथक पथकाचे वनक्षेत्रपाल शरण देशपांडे आणि दक्षता पथकातील कर्मचार्‍यांनी पार पाडली. कारवाईत वनपाल प्रकाश साळुंखे, वनरक्षक जावेद खान,वाहनचालक सुनिल वारघडे आणि प्रविण खरात यांनी भाग घेतला होता.

Exit mobile version