। अलिबाग । वार्ताहर ।
मुंबई विद्यापीठाच्या 57व्या युवा महोत्सवामध्ये चोंढी-किहीम येथील लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लोकनृत्य या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
विद्यार्थी विकास कक्ष मुंबई विद्यापीठांतर्गत 57 वा युवा महोत्सव डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवे-कोलाड येथे पार पडला. या युवा महोत्सवामध्ये रायगड साउथ झोन आठमध्ये 27 महाविद्यालयांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने विविध स्पर्धांमध्ये सहभाग दर्शवला होता. त्यातील लोकनृत्य (वारली) या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील सुरक्षा थळे, नेहा पाटील, सृष्टी पाटील, सई राणे, दिया म्हात्रे, वैष्णवी घरत, कल्पित पवार, वैभव मुदळकर, जयेश कालेल, ऋषिकेश गोळे, पूजा भोईर, सृष्टी माने यांनी प्रथम क्रमांक मिळवून यश प्राप्त केले आहे. तसेच, मोनो आर्ट या स्पर्धेत नेहा पाटील या विद्यार्थिनीने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रवींद्र ठाकूर, प्रमोद पाटील, किरण ठाकूर संस्थेचे इतर पदाधिकारी, प्राचार्या लीना पाटील तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख तृप्ती खोत यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच, महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.