| नेरळ | वार्ताहर |
मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये रायगड झोनमधून अभिनव ज्ञान मंदिर महाविद्यालयाचा मनोज चव्हाण रांगोळी स्पर्धेत प्रथम, तर तालवाद्य स्पर्धेत कृणाल चौधरी तृतीय क्रमांक मिळविला.
55 व्या सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये एकूण 32 स्पर्धांचे आयोजन कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयामध्ये करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये अभिनव ज्ञान मंदिर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील 15 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. रांगोळी, पोस्टर मेकिंग, कार्टुन, मेहंदी, प्रश्नमंजुषा, कथाकथन, इंडियन ग्रुप साँग, इंडियन लाईट लोकल सोलो, तालवाद्य, ऑन दी स्पॉट पेंटिंग, वक्तृत्व या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या विद्यार्थ्यांमध्ये रांगोळी स्पर्धेत प्रथम वर्ष विज्ञान शाखेचा मनोज चव्हाण यास प्रथम क्रमांक मिळाला. तर, प्रथम वर्ष कला शाखेचा कृणाल चौधरी यास तालवाद्य स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळालेला आहे. विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शिल्पा भुसारी आणि सांस्कृतिक विभाग साहाय्यक प्रा. राधिका राणे यांनी मार्गदर्शन केले. अभिनव ज्ञान मंदिर संस्थेचे अध्यक्ष गणेश वैद्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण घोडविंदे यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.