शेतकरी योद्धा कुक्कुटपालन संघटनेला यश

| पेण | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्था रायगड यांनी कुक्कुटपालन या व्यवसायासाठी बांधण्यात आलेल्या इमारतींना (पोल्ट्री शेडला) ग्रामपंचायतीकडून आकारण्यात येणार्‍या करासंदर्भात रायगड जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे दाद मागितली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या बैठकीत पोल्ट्री शेडला व्यावसायिक इमारत न समजता किमान कर दर आकारुन झोपडी किंवा मातीचे घर यानुसार कराचा दर लावावा, असा चर्चेअंती निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, छत्तरसिंग रजपूत, एम.जी. शिंदे, पेण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पी.जी. म्हात्रे, रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेचे अध्यक्ष अनिल खामकर, दिपक पाटील, मनोज दासगावकर, राम गिजे, राजेश पाटील, संजय बिर्जे आदी उपस्थित होते.

बैठकीत झालेल्या चर्चेनुसार सन 2000 पूर्वी पोल्ट्री शेडवरील कर आकारणी ही चुकीची असल्याचे मान्य करुन त्यात सुधारणा करुन नवीन कर आकारणीनुसार कुक्कुटपालन हा स्वतंत्र उद्योग न समजता तो शेतीपूरक उद्योग आहे, असे समजून पोल्ट्री शेडला व्यावसायिक इमारत न समजता किमान कर दर आकारुन झोपडी किंवा मातीचे घर यानुसार कराचा दर लावावा, असा निर्णय देण्यात आला. तशा प्रकारचे पत्र डॉ. किरण पाटील यांनी पेण पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना पाठविले आहे.

Exit mobile version