आता रडायचे नाही लढायचे; रायगड मधील कुक्कुट पालन संघटनेचा निर्धार
। पेण । वार्ताहर ।
रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेच्या वतीने महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा शेतकरी आत्मचिंतन व शक्ती परीक्षण मेळाव्याचे आयोजान रविवारी (दि.13) करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील संघटनेने एकत्र येऊन महाराष्ट्राची एकमेव संघटना करण्याची घोषणा मेळाव्या प्रसंगी पेण तालुकाध्यक्ष स्वप्निल म्हात्रे यांनी केली.
तसेच संघटनेने केलेल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा पुढे चालू ठेवण्यात येण्याचा इशारा सर्व जिल्ह्यातील संघटनेकडून देण्यात आला. कंपनीकडून कुक्कुट पालन करणार्या शेतकर्यांची पिळवणूक सुरू आहे, शेतकर्यांबरोबर करण्यात आलेल्या करारा प्रमाणे कंपनी मोबदला देत नसून शेतकर्यांना वेठीस धरण्यात येत आहे यांची दखल शासनाकडून ही घेतली जात नसल्याने रायगड जिल्ह्यातील पेण येथे महाराष्ट्रातील अकोला, नांदेड, पालघर, पुणे, ठाणे, रायगड, अहमदनगर, नाशिक, हिंगोली आदी जिल्ह्यातील शेतकर्यांचा मेळावा घेण्यात आला.
यावेळी रायगड जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, एकीकडे सरकार बोलते पोल्ट्री व्यवसाय हा शेती पुरक व्यवसाय आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारा औषधांचा खर्च, लाईट बिल आणि खादयाचे वाढते दर यामुळे शेतकर्याच्या पदरी नुकसानच येत आहे. तसेच सरकारने या सर्व बाबींचा विचार करून पहिली गोष्ट हमी भाव दिला पाहिजे, इलेक्ट्रीक बील कृषीक केला पाहीजे, ग्रामपंचायत करातून सुट दिली पाहिजे, ठेकेदार फार्मिंग कंपनीकडून मिळणारे खाद्य आणि पिल्ल हे योग्य आहे की नाही यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरकारने लॅब दिले पाहिजेत. त्यामुळे कंपनीकडून फसवणूक होणार नाही. या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर येत्या काही दिवसात महाराष्ट्र पोल्ट्री संघटना आझाद मैदानावर धरण आंदोलन करणार असल्याची माहिती रायगड जिल्हा पोल्ट्री संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर यांनी दिली.
यावेळी रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्था अध्यक्ष अनिल खामकर, अकोला अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, पालघर अध्यक्ष संजय शेलार, नांदेड अध्यक्ष पंढरीनाथ सावळे, अहमदनगर सर्जेराव भोसले, ठाणे अध्यक्ष प्रकाश लसणे, पुणे अध्यक्ष गोपाळे गुरुजी, संतोष रासकर,, विलास साळवी, खजीनदार मनोज दासगावकर, सचिव दिपक पाटील, संचालक राजेश पाटील पेण, चंद्रहास बादळ खालापूर, संचालक संजय बिरजे रोहा, संतोष देशमुख, पनवेल संचालक जुईकर, अलिबाग तालुका प्रमुख नचिकेत पाटील, शंकर तांबोली पेण, संतोष महाडिक पेण, तालुका प्रमुख पाली सुधागड निखील ढोकले आदी जिल्ह्यातील कुक्कुट पालन पोल्ट्री योद्धा, पदाधिकारी शेतकर्यांनी आपल्या व्यथा प्रखरतेने मांडल्या.