| तळा | वार्ताहर |
संध्या रमेश कोलवणकर तळा येथे स्थायिक असून, पती रमेश कोलवणकर, सोहम व वैभव दोन मुले आणि नीलम, धनश्री दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे. 48 वर्षांपूर्वी विवाह करून तळे येथे कोलवणकरांची सून म्हणून प्रवेश केला तो एक गृहिणी म्हणूनच. परंतु घरातील आर्थिक परिस्थिती नाजूक. पती रमेश हे रेशनिंग दुकानात कारकून म्हणून काम करीत असले तरी तशी परिस्थिती गरिबीची. परंतु यामधून काहीतरी मार्ग काढला पाहिजे या दृष्टीने प्रथम पीठगिरणी घरीच सुरू केली. या व्यवसायात ओळख वाढली, जम बसला. ग्राहकांची मसाला गिरणीची मागणी सुरू झाली, त्यामधून मसाला गिरणी आणि शेजारील हायस्कूल, प्राथमिक शाळा, जुनियर कॉलेज, वरिष्ठ महाविद्यालय असल्यामुळे वडापावदेखील सुरू केले.
यामध्ये विश्वासहर्ता सांभाळल्यामुळे ग्राहक नियमित येत होते. पण खरा जम बसविला तो मसाला विक्रीमध्ये, असे सौ. कोलवणकर सांगतात. रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी ‘कोलवणकर मसाले’ म्हणून लोक (ग्राहक) निवड करतात. चविष्ट मसाले असल्यामुळे खप सुंदर होतो. काही ठराविक गिर्हाईके आगोटीला मे महिन्याच्या दरम्यान पुणे, मुंबईकडे पण आमचे येथून मसाले नेत असतात. मसाला दळण्यासाठी तळे तालुक्यासाह रोहा, मुरुड, म्हसळा, माणगाव तालुक्यातूनही ग्राहक येत असतात. ग्राहकांचे समाधान यात आम्हाला आनंद आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुरू केलेले व्यवसाय आज प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. मार्च 2022 मध्ये तळा प्रेस क्लबने ‘यशस्वी उद्योजिका’ म्हणून महिला दिनीच सन्मानित केले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे 2023 मध्ये ‘यशस्वी उद्योजिका’ म्हणून नारीशक्तीचा गौरव केला आहे. या व्यवसायात उत्तम यश मिळविले आहे.
यशस्वी उद्योजिका – संध्या कोलवणकर
