दोघांना पाण्यातून काढण्यात यश

| नेरळ | प्रतिनिधी |

उल्हास नदीला पूर आल्यानंतर या नदीच्या तीरावर असलेल्या शेलू गावाला सातत्याने महापुराचा फटका बसत असतो. मंगळवारी रात्रीपासून उल्हास नदीला पूर आला असून, शेलू-निकोप गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे त्या भागातील विविध चाळींमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. त्यातच उल्हास नदीच्या कडेला असलेल्या माजी सरपंच शिवाजी खारीक यांच्या फार्महाऊसवर असलेले दोघेजण पाण्यात अडकून पडले होते. त्या फार्महाऊसला चारही बाजूने पाण्याने वेढले होते. त्याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस पाटील मनोज पाटील यांनी त्या दोन व्यक्तींना पाण्यातून बाहेर काढता येईल काय? याची चाचपणी केली. मात्र, पाण्यात उतरून त्या दोघांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमची आवश्यकता असल्याची खात्री पटल्यावर पोलीस पाटील यांनी नेरळ पोलिसांना कळवले. त्यांनी तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांना त्याबाबत माहिती दिली. दरम्यान, तहसीलदार डॉ. धनंजय जाधव हे देखील शेलू येथे पोहचले. त्यानंतर पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने महापुराच्या पाण्यात उतरून त्या दोघांना रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नेरळचे उप निरीक्षक गच्चे आणि पोलीस कर्मचारी कणके पोहत त्या फार्महाऊस मध्ये पोहचले. शेवटी दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर त्या ठिकाणी अडकलेल्या दोघांना पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले.

Exit mobile version