शवविच्छेदन अहवालानंतर चित्र होणार स्पष्ट
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबागमधील वरसोली येथील एका लॉजवर 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाच्या या आकस्मात मृत्यूनंतर खळबळ उडाली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता अहवालाची प्रतिक्षा लागून राहिली असून, याबाबत आकस्मात मृत्यूची नोंद अलिबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पवन वासूदेव कोटकर असे या मृत तरुणाचे नाव आहे. हा तरुण मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील रहिवासी आहे. अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील एका लॉजमध्ये मुंबईतील 31 वर्षीय एका विवाहित महिलेसोबत आला होता. दुपारी रुम बुक केली. दुपारनंतर अचानक त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात विभागात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून तो अगोदरच मृत असल्याचे घोषित केले. मात्र, कोणाचीही तक्रार नसल्याने शवविच्छेदन न करता, मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता. परंतु, या तरुणाचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप झाल्यावर पोलीस आणि आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले. नातेवाईकांच्या ताब्यात दिलेला मृतदेह पुन्हा रुग्णालयात आणण्यास सांगितले. त्यानंतर उपचारापुर्वी मयत झाल्याचे रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या तरुणाचा मृत्यू संशयास्पद असल्याचे आरोप होत आहे. तरुणाच्या आकस्मात मृत्यूने खळबळ उडाली असून, शवविच्छेदनाच्या अहवालानंतर खरे चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस हवालदार राकेश जोशी अधिक तपास करीत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन रुमची तपासणी केली असून, त्याठिकाणी काही वस्तू सापडल्या त्या ताब्यात घेतल्या आहेत.
व्हीसेरा कलिनामध्ये पाठविणार
कोर्लई येथील तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी आता हालचाल सुरु केली आहे. मृत व्यक्तीच्या शरीरातील अंतर्गत अवयव गोळा करून त्याचे नमुने अर्थात व्हिसेरा सिलबंद करून मुंबईतील कलिनामधील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत.
वरसोली येथील एका लॉजमध्ये तरुणासोबत आलेली त्याची मैत्रिण विवाहीत असून ती दोन मुलांची आई आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्यासोबत तिची मैत्री होती. यापुर्वीदेखील ते दोघेजण याच ठिकाणी फिरण्यासाठी आले होते, अशी चर्चा सुरु आहे.
