पर्यटकांची गैरसोय
। मुरुड-जंजिरा । प्रतिनिधी ।
ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी तब्बल 111 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नव्या प्रवासी जेट्टीचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. या जेट्टीमुळे यांत्रिकी बोटींद्वारे पर्यटकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर झाला असला, तरी जेट्टी किल्ल्याच्या मागील बाजूस असल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आल्यानंतर राजपुरी येथील पारंपरिक शिडाच्या बोटधारकांनी संतप्त होत बोटसेवा बंद ठेवत संप पुकारला.
सकाळपासूनच राजपुरी बंदरावर शिडाच्या बोटी थांबवण्यात आल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय झाली. अनेक पर्यटक किल्ल्यावर जाण्यासाठी ताटकळत उभे राहिले. अखेर पोलिसांनी पर्यटकांना खोरा बंदरातून यांत्रिकी बोटीने किल्ल्याकडे जाण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, नव्या जेट्टीवर उतरल्यावर पर्यटकांना किल्ल्यापर्यंत पायी बराच पल्ला गाठावा लागत आहे. त्यामुळे किल्ला पाहण्यासाठी अधिक वेळ मिळावा, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे. मात्र, बोटधारकांकडून “अर्ध्या तासात परत या” अशा सूचना दिल्या जात असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
राजपुरीतील शिडाच्या बोटधारकांचा दावा आहे की, किल्ल्याच्या मागील बाजूस समुद्रातील वारे आणि लाटांचा जोर अधिक असल्याने शिडाच्या बोटीने तेथे जाणे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार केवळ शिडाच्या बोटींसाठी खुले ठेवावे, अशी त्यांची मागणी आहे.
संप मिटवण्यासाठी मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी एम. पवार यांनी स्वतः शिडाच्या बोटीतून नव्या जेट्टीकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, समुद्रातील लाटांचा तडाखा आणि वाऱ्याचा वेग यामुळे बोट नेण्यात मोठ्या अडचणी आल्या. त्यानंतर त्यांनी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार मर्यादित स्वरूपात खुले ठेवण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे.
येत्या 26 मेपासून समुद्रातील हवामान खराब होण्याची शक्यता लक्षात घेता नियमानुसार बोटसेवा बंद होणार आहे. त्याआधीच निर्माण झालेल्या या वादामुळे स्थानिक बोट व्यावसायिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खोरा बंदरातून यांत्रिकी बोटीने पर्यटकांना किल्ल्यावर नेले जात असले तरी तेथील जेट्टीवर उन्हापासून संरक्षणासाठी शेडची व्यवस्था नसल्याने पर्यटकांना कडक उन्हात उभे राहावे लागत आहे. त्यामुळे पर्यटकांनी प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे.
नवीन जेटी सुरक्षित आहे, पण पर्यटकांना किल्ला पाहण्यासाठी पुरेसा वेळ मिळायला हवा. घाईगडबडीत पर्यटनाचा आनंदच निघून जातो.
– एक पर्यटक, पुणे
समुद्राच्या परिस्थितीत शिडाच्या बोटीने मागील बाजूस जाणे धोकादायक आहे. पर्यटकांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने सर्व संबंधित विभागांशी चर्चा करून तोडगा काढला जाईल.
– एम. पवार, अधिकारी, मेरीटाईम बोर्ड
