आदिवासींच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवणारा चित्रपट
| पाली | विनोद भोईर |
शासकीय सेवेत कार्यरत असताना समाजातील वंचित, उपेक्षित आणि शोषित घटकांचे जीवन जवळून अनुभवणाऱ्या एका महसूल अधिकाऱ्याने त्या अनुभवांना कलात्मक रूप दिले आणि त्यातून जन्माला आला ‘सुधागड 07′ हा चित्रपट. सुधागडचे माजी तहसीलदार दिलीप रायण्णावर यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला हा चित्रपट सध्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजत असून, अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी झालेल्या निवडीमुळे पुन्हा चर्चेत आला आहे.
सन 2019-22 या कालावधीत सुधागड तालुक्यात तहसीलदार म्हणून कार्यरत असताना दिलीप रायण्णावर यांनी आदिवासी, कातकरी आणि ग्रामीण समाजाचे जीवन जवळून अनुभवले. दुर्गम वाड्या-वस्त्यांतील नागरिकांचे प्रश्न, शासन योजनांपासून वंचित राहणारे कुटुंब, कोळसा भट्ट्यांवर काम करणाऱ्या मजुरांचे जीवन, दलालांच्या साखळीत अडकलेली कुटुंबे आणि विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर फेकला गेलेला समाज यांचे वास्तव त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. याच अनुभवांनी पुढे ‘सुधागड 07’च्या कथेला आकार दिला. एका बाजूला स्वतःला प्रगत समजणारा समाज आणि दुसऱ्या बाजूला पालावर जीवन जगणारे, शिक्षणापासून वंचित राहिलेले, दारिद्र्याच्या दुष्टचक्रात अडकलेले कातकरी समाजातील कुटुंब यांच्यातील दरी चित्रपट प्रभावीपणे दाखवतो. तसेच, या चित्रपटात कोळसा भट्ट्यांवरील मजुरी, दलालांचे जाळे, आर्थिक शोषण, व्यसनाधीनता, अज्ञान आणि सामाजिक उपेक्षा यांचे वास्तवदर्शी चित्रण करण्यात आले आहे.
‘सुधागड 07’चे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील स्थानिक कलाकार. सुधागड तालुक्यातील कलाकारांनी साकारलेल्या भूमिका चित्रपटाला अस्सलपणा प्राप्त करून देतात. स्थानिक बोलीभाषा, हावभाव, ग्रामीण जीवनशैली आणि कातकरी समाजाच्या संस्कृतीचे चित्रण अत्यंत नैसर्गिकपणे पडद्यावर उतरले आहे. त्यामुळे अनेक प्रसंग हे चित्रपटातील नसून वास्तवातील वाटतात. तांत्रिकदृष्ट्याही चित्रपट सरस ठरतो. उत्कृष्ट छायाचित्रण, ड्रोनचा प्रभावी वापर, भावनांना साद घालणारे पार्श्वसंगीत आणि आशयपूर्ण गाणी ही त्याची बलस्थाने आहेत. विशेषतः “कोळसाच्या जीवाला आगीचा आधार हो..’ हे गीत चित्रपटाच्या आशयाला साजेसे ठरते. प्रत्येक गाणे कथेला पुढे नेणारे आणि पात्रांच्या भावविश्वाशी जोडणारे आहे. सध्या हा चित्रमपट विविध चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित होत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 10 पुरस्कारांवर नाव कोरले असून अनेक स्तरांतून त्याचे कौतुक झाले आहे. सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट सर्वसामान्य प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, सामाजिक आशय, वास्तवदर्शी मांडणी आणि स्थानिक कलाकारांचा प्रभावी अभिनय यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत ‘सुधागड 07′ वेगळी छाप पाडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
चित्रपटाविषयी थोडक्यात
चित्रपट : सुधागड 07
कालावधी : 2 तास 3 मिनिटे
दिग्दर्शक आणि कथा : दिलीप रायण्णावर
सुधागडमधील कार्यकाळ : 2019-22
चित्रीकरण : सुधागड (रायगड) व जत (सांगली)
प्राप्त पुरस्कार : 10
अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड
प्रदर्शित होणार : सप्टेंबर 2026
पदार्पणातच दिलीप रायण्णावर यांनी दमदार शड्डू ठोकला असून, सामाजिक वास्तवाला कलात्मक अभिव्यक्ती देणारी ही प्रभावी कलाकृती आहे. ‘सुधागड 07’ला महोत्सवांसह चित्रपटगृहांतही उत्तम प्रतिसाद मिळेल.
आलोक जत्राटकर,
पीआरओ, शिवाजी विद्यापीठ
