सुधागड किल्ल्याला मिळणार राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा

किल्ल्याचे रुप पालटणार,
पर्यटनवाढीसह रोजगार वृद्धी,
देदीप्यमान इतिहास येणार उजेडात

। सुधागड-पाली । वार्ताहर ।
शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुधागड किल्ल्याला आता राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळणार आहे.
यामुळे किल्ल्याचे रूप पालटणार आहे. तसेच पर्यटनवाढीसह तालुक्यात रोजगार वृद्धीदेखील होईल. याबरोबरच येथील देदीप्यमान इतिहास उजेडात येणार आहे. यामुळे स्थानिकांसह इतिहास अभ्यासक व दुर्गप्रेमी सुखावले आहेत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील काही किल्ल्यांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी 5-6 किल्ले निवडले आहेत. पथदर्शी स्वरूपात हे किल्ले निवडून या किल्ल्याचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांनी एक समितीदेखील नेमली आहे. कोकणातील सुधागड, सिंधुदुर्ग व विजयदुर्ग या तीन किल्ल्यांचा त्यात समावेश आहे. त्यातील रायगड जिल्ह्यातील सुधागड हा एकमेव किल्ला निवडण्यात आला आहे. त्यातील सिंधुदुर्ग व विजयदुर्ग हे किल्ले केंद्राने संरक्षित केले आहेत. मात्र, सुधागड किल्ला अजूनपर्यंत असंरक्षित असल्याने त्याला संरक्षित केले जात आहे. त्यानुसार राज्य सरकारने राज्य पुरातत्व विभागास सुधागड किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्य पुरातत्त्व विभागाने मंत्रालयात नोटिफिकेशन पाठविले आहे. गुरुवारी (ता.21) सुधागड किल्ल्याचा जतन दुरुस्ती आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने राज्य पुरातत्व विभाग सहाय्यक संचालक विलास वाहणे व त्यांच्या टीमने सुधागड किल्ल्याची तेथील वास्तू व जाणार्‍या मार्गांची पाहणी केली. सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यावर लवकरच किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात येणार आहे, असे विलास वाहणे यांनी सांगितले.

विविध निधी उपलब्ध होतील

सुधागड किल्ला संरक्षित झाल्यानंतर येथे पर्यटन विकासाला अधिक चालना मिळेल. यातून रोजगार वृद्धी होईल. शिवाय, विविध निधी उपलब्ध होतील आणि सर्वांगीण विकास घडून येईल. पर्यटनवाढीसाठी पर्यटन विभाग या ठिकाणी विविध योजना राबवू शकते. तसेच रायगडप्रमाणे येथे रोपवेदेखील होऊ शकतो. किल्ल्याचा पायरी मार्ग केला जाईल. किल्ल्यावरील विविध वास्तूंची देखभाल दुरुस्ती केली जाईल. किल्ल्याचे रूप पालटेल. दुर्गप्रेमी, दुर्ग संवर्धन संस्थांचे सहकार्य घेऊन ही कामे केली जातील.

सुधागड किल्ला

सुधागड किल्ला इ.स. 1648 मध्ये नारो मुकूंद यांनी मुघलांकडून जिंकून घेतला आणि सुधागड किल्ला शिवरायांच्या स्वराज्यात दाखल झाला. किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 620 मीटर आहे. सुधागड किल्ल्याच्या सखल भागाचे क्षेत्रफळ सुमारे 55 हेक्टर आहे.

कसे जाल?

पालीवरून 12 कि.मी.वर नाडसूर हे गाव आहे. नाडसूरकडे जाताना पूर्वेकडे दीड किमीवर धोंडसे गावावरून चालत सुधागड वर जाता येते. साधारण दोन तास चालत जावे लागते वाटेत नदी ओलांडावी लागते. किल्यावर जाताना तीन मुख्य दरवाजे लागतात. गडावर जाणार्‍या पायर्‍या आता पूर्णपणे कोसळलेल्या आहेत.

काय पाहाल?

किल्ल्यावर पंतसचिवांचा सरकार वाडा, दोन मोठी तळी, धान्य कोठार, घरांचे अवशेष, पाण्याच्या टाक्या व हौद आहे. तसेच घोडेपागा, अंबरखाना, सदर विभाग, बारुद खाना, भुयारी मार्ग, तटबंदी हि ठिकाणे अर्धवट स्थितीत आहेत. शत्रुला कडेलोट करण्यासाठी टकमक टोक आहे. शंकराचे देऊळ तसेच भोराई देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे.

Exit mobile version