| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
सुधागड तालुका मराठा समाज या संस्थेच्या वतीने आणि तालुक्यातील सर्व समाजबांधवांच्या सहकार्याने एक व्यापक आणि प्रगतशील आदर्श आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. ही आचारसंहिता विजयादशमीच्या शुभदिनापासून अंमलात आणण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष धनंजय सटुराम साजेकर आणि मुख्य कार्यकारिणी, रुढी-परंपरा समिती व इतर पदाधिकाऱ्यांनी या आचारसंहितेची अंमलबजावणी करताना समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. विवाह, ओटी भरणे, बाळंतपण, मरणोत्तर विधी आणि इतर धार्मिक-सामाजिक कार्यक्रमांमध्ये अनावश्यक खर्च, बडेजावपणा, अंधश्रद्धा आणि सामाजिक भेद मिटवण्याचा प्रयत्न या संहितेतून स्पष्टपणे दिसून येतो.
विवाह समारंभात साधेपणावर भर
हुंडा प्रथा, प्रि-वेडिंग शूट, डीजे-बेंजोचा अतिरेक, केक कापणे, साखरपुड्यातील बडेजाव, हळदी समारंभातील मांसाहार व मद्यपान यांसारख्या गोष्टींना संहितेत स्पष्टपणे नकार देण्यात आला आहे. विवाहपूर्व वैद्यकीय तपासणी, क्रेडिट स्कोअर तपासणी, सामुदायिक विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन आणि विधवा महिलांना सन्मान यांसारख्या प्रगत विचारांचा समावेशही केला आहे.
मरणोत्तर विधींमध्ये सामाजिक समतेचा आग्रह
महिलांना अंत्यसंस्काराचा अधिकार, विधवांच्या बांगड्या फोडण्यास मनाई, राख झाडांना टाकण्याचा पर्याय, आणि 5 व्या दिवशी विधी उरकण्याचा पर्याय यांसारख्या सुधारणांचा समावेश आहे. दुखवट्याच्या काळात अनावश्यक भेटवस्तू, चहा-साखर देणे, आणि अति खर्चिक जेवण टाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
