डोंगराच्या खोदकामाने धोक्याची घंटा, ग्रामस्थांच्या पोटात भीतीचा गोळा
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
सुधागड तालुक्यातील चिवे ग्रामपंचायत हद्दीतील उसाळे गावालगत असलेला भला मोठा डोंगर खचून अनेक घरे दरडीखाली गाडली जाण्याची भीती येथील गावकर्यांना सतावत आहे. आज ना उद्या उसाळे गावावर माळीण, तळीयेसारख्या भयावह दरड दुर्घटनेसारखे संकट ओढवणार असून मुख्यमंत्री महोदय आमचे जीव वाचवा, असे साकडे आणि आर्त विनवणी येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
एका विकासकाने बांधकामे करताना डोंगरातील मातीचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले आहे. तसेच विविध प्रकारची झाडेदेखील तोडली आहेत. शिवाय रायगड जिल्हा परिषद शाळेची तोडफोड केली. उसाळे गावठाण यातून रहदारीसाठी रस्ता घेतला आहे. पूर्वापार वहीवटीचे तसेच गुरचरण आणि गणपती विसर्जन घाटाकडे जाणार्या रस्त्यांची अडवणूक केली आहे, असा गंभीर आरोप करीत उसाळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे पाझर तलावाकडे जाण्याचा रस्तादेखील या बांधकामा दरम्यान बंद झाला असल्याची कैफियत येथील शेकडो ग्रामस्थांनी सरकार दरबारी केलेल्या निवेदनात मांडली आहे.
यावेळी बोलताना नथुराम वाघमारे म्हणाले की, याठिकाणी 40 घरांचा उंबरठा असून साधारणतः 200 च्या आसपास लोकवस्ती आहे. गावालगत विकासकाकडून होणार्या डोंगराच्या खोदकामाने धोक्याची घंटा वाजत आहे. आम्ही सारेच नागरिक दिवसरात्र जीव मुठीत घेऊन जगत आहोत. कधी माळीण, इर्शाळवाडीसारखी दुर्घटना घडेल याचा नेम नाही. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी वाघमारे यांनी केली.
यावेळी उसाळेचे माजी पोलीस पाटील हरिश्चंद्र वाघमारे, अंजना वाघमारे, लक्ष्मण खानेकर, मारूती वाघमारे, उत्तम सावंत, चंद्रकांत यादव, भालचंद्र खानेकर, गणेश खानेकर, बाळा खानेकर, नथुराम वाघमारे, संजित वाघमारे, प्रवीण वाघमारे, मारूती वाघमारे, गणेश वाघमारे, बजरंग वाघमारे, प्रवीण चव्हाण, समीर वाघमारे, शैलेश खानेकर, प्रदिप खानेकर, योगेश खानेकर, रमेश चंदर वाघमारे, महेश खानेकर, सनी खानेकर, प्रकाश वाघमारे, अजित सावंत, सागर वाघमारे आदीसह महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
गावाच्या पूर्व बाजूला डोंगर खोदण्याचे काम सुरु आहे. अतिवृष्टीमध्ये डोंगर खचला तर संपूर्ण गाव गाडला जाईल. आम्ही भीतीने रात्र-रात्र झोपत नाही. लवकरच उपाययोजना करावी.
– हरिचंद्र वाघमारे, माजी पोलीस पाटील, उसाळे
याप्रकरणी उसाळे ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारी निवेदनाची दखल घेतली असून नायब तहसीलदार यांना स्थळपाहणी आणि चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्राप्त अहवालानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
– उत्तम कुंभार, तहसीलदार पाली-सुधागड