अखेर न्याय मिळाला
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील 25 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची अनेक वर्षांपासूनची मागणी जिल्हा प्रशासनाने मान्य केली आहे. 2013 पासून कर्जत तालुक्यात निवृत्त झालेल्या सेविका आणि मदतनीस यांना प्रोत्साहन अनुदान मिळाले नव्हते. निवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या सातत्याने आपल्या हक्काच्या प्रोत्साहन अनुदानासाठी पाठपुरावा करीत होत्या. दरम्यान, तुटपुंज्या पगारात नोकरी करणार्या या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना निवृत्तीनंतर प्रोत्साहन अनुदान मिळेल, या आशेवर वयाच्या 64 वर्षापर्यंत सेवा देणार्या काही अंगणवाडी सेविका सध्या या जगात देखील नाहीत.
एकात्मिक बालविकास विभागाने अंगणवाडी केंद्र हि संकल्पना पुढे आणली आणि त्यावेळी आपल्या गावातील शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना शाळेची सवय लागावी म्हणून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या केंद्र चालवू लागल्या. त्यावेळी महिना पाचशे रुपयांपासून सेवा देणार्या अंगणवाडी सेविका या लहान बालकांना गाणी शिकवत दोन ते तीन तास अन्य मुलांमध्ये त्या बालकांना रामाविण्याची कसरत करत होत्या. त्यात पोषण आहार मिळत असल्याने बालकेदेखील अंगणवाडी शाळत येऊन बसायची.
पोषण आहार शिजवून देण्यासाठी शासनाने त्यांची अंगणवाडी मदतनीस म्हणून नियुक्ती केली. या अंगणवाडी सेविकांना पुढे एक हजार, दोन हजार, तीन हजार असे मानधन महिना मिळू लागले. मात्र वयाचे 65 वर्षे वय होईपर्यंत त्यांचे अंगणवाडीमध्ये कार्य सुरु होते. तर निवृत्तीनंतर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.
मात्र 2013 पासून 2024 पर्यंत कर्जत तालुक्यातील 25 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यातील अनेक अंगणवाडी सेविका आणि मदतनिस यांच्यासाठी प्रोत्साहन रक्कम हि कुटुंबाला हातभार लावणारी असल्याने कर्जत पंचायत समितीमध्ये त्यांच्या येरझार्या सुरु होत्या. अंगणवाडी सेविका यांना एक लाखाचे प्रोत्साहन अनुदान तर अंगणवाडी मदतनीस 75 हजाराचे प्रोत्साहन अनुदान निवृत्तीनंतर मिळणार होते.त्या अनुदानासाठी कर्जत तालुक्यात निवृत्त झालेल्या 25 सेविका आणि मदतनीस यांच्या फेर्या दर आठवड्याला सुरु होत्या. अगदी तुटपुंज्या मानधनावर सेवा देणार्या या अंगणवाडी सेविका आणि मदतनिस यांना ती एकगठ्ठा रक्कम मोठी मदतगार ठरणार होती. त्यामुळे अनेकजणी आपल्या निवृत्तीनंतरच्या प्रोत्साहन भत्त्याची वाट पाहत होत्या.
शेवटी रायगड जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागाला जाग आली आणि अखेर सर्व 25 निवृत्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना त्यांचे निवृत्तीनंतर अनुदान त्यांच्या बँक खात्यात 5 आणि 6 ऑगस्ट रोजी पोहचले असल्याची माहिती जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागाकडून देण्यात आली आहे.
मृत्यूनंतर प्रशासनाला जाग
आज अंगणवाडी सेविका तसे मतदनीसांना अनुदान मिळाले खरे, मात्र त्यापैकी काही आज या जगात नाहीत. त्यांच्या बँक खात्यात जर ते अनुदान पोहचले असेल तर त्या अनुदानाचा त्यांच्या या जगाच्या निरोपानंतर काय फायदा? असा प्रश्न त्या अंगणवाडी सेविकांचे नातेवाईक आणि कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. 65 वर्षे निस्वार्थीपणे अव्याहतपणे सेवा दिल्यानंतर निवृत्तीनंतरचे प्रोत्साहन अनुदान शासन त्यांच्या हयातीत देणार नसेल तर मग अगदी तुटपुंज्या पगारात सेवा दिल्याचा काय फायदा? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे.