मुंबई उच्च न्ययालयात पिटिशन फेटाळले
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत विधानसभा मतदारसंघात पराभूत झालेले अपक्ष उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांनी सर्वोच्य न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान दिले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही हजार मतांनी पराभूत झाल्यानंतर सुधाकर घारे यांनी मुंबई उच्च न्यायलायत पिटिशन दाखल केले होते. ते पिटिशन फेटाळून लावून महेंद्र थोरवे यांची आमदारकी कायम ठेवण्याचा निर्णय दिला होता. दरम्यान, या निर्णयाला घारे यांच्याकडून सुप्रीम कोर्टात दाद मागितली आहे.
2024 मध्ये झालेल्या कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेना भाजप राष्ट्रवादी यांच्या महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी विजय मिळविला होता. त्यानंतर काही महिन्यांनी पराभूत झालेले अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयाला आव्हान दिले होते. त्या याचिकेत आमदार म्हणून निवडून आलेले महेंद्र थोरवे यांनी मतदारांना भडकावणे, धमकावणे तसेच आपल्या नावाशी साम्य असलेले सुधाकर घारे या नावाचे डमी उमेदवार उभे करून आपला विजय हिरावून घेतला असा आरोप सुधाकर घारे यांच्या याचिकेत करण्यात आला होता. गेली सहा महिने या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. अखेर या याचिकेचा निकाल दिला असून, विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली होती. मात्र, त्यानंतर सुधाकर घारे अधिक आक्रमक झाले असून, त्यांच्याकडून सर्वोच्य न्यायालयात 24 सप्टेंबर रोजीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने सुधाकर घारे यांच्या पिटिशन वर 24 सप्टेंबर रोजी निर्णय दिल्यानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांनी आव्हान दिले आहे. घारे यांच्याकडून आता आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयला थेट सर्वोच्य न्यायालयात आव्हान दिले असून, अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी आपला विजय होत नाही तोवर लढा दिला जाणार असून आपला न्यायालयावर विश्वास असून सत्याच्या बाजूचा विजय उशिरा होईल पण विजय होईलच असा विश्वास व्यक्त केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात सुधाकर घारे यांच्याकडून नामांकित वकील अॅड. आरिफ बुकवाला, अॅड. महेक बुकवाला, अॅड. पूजा थोरात, यांनी बाजू मांडली होती. मात्र, सर्वोच्य न्यायालयात सुधाकर घारे यांच्याकडून कोणत्या नामांकित वकिलांवर जबाबदारी दिली आहे. हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
