। कर्जत । वार्ताहर ।
सध्या राजकारणामध्ये पक्ष निष्ठा, वैचारीक बैठक यांना महत्व राहीलेले नाही. सकाळी एका पक्षात, तर रात्री अन्य पक्षात राजकीय नेते जात असल्याने राजकारणात बेबनाव दिसत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी घारे यांना पाठबळ देत थोरवेंसमोर आव्हान उभे केल्याने कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरुन महायुतीत तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे करत आहेत. त्यामुळे जागावाटपात ही जागा शिंदे गटाला सुटणार असा थोरवे यांचा दावा आहे. मात्र दुसरीकडे सुधाकर घारे यांनी देखील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. कर्जत खालापूरात सुधाकर घारे आणि महेंद्र थोरवे यांच्यात सध्या राजकीय वाकयुद्ध रंगले आहे. दोघांनीही महायुतीचे तिकीट आपल्यालाच मिळणार असा दावा करत निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे.
महायुतीचे जागावाटप अद्याप निश्चित झालेले नाही. भाजपची देखील या मतदारसंघात चाचपणी सुरु आहे. भाजपचे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष किरण ठाकरे हे देखील या मतदारसंघातून निवडणुक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला आहे. मात्र थोरवे यांच्यासमोर मोठे आव्हान घारे यांनी उभे केले आहे. थोरवे यांनी महायुतीचा घटकपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीधर्म पाळत नाही, अशी टीका करत सुनील तटकरे यांच्यावर देखील लक्ष्य केले होते. त्यावर सुनील तटकरे यांनी त्यांच्या टीकेची दखल न घेता या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा सांगत सुधाकर घारे यांना पाठबळ दिले. सुधाकर घारे गेल्या दीड दोन वर्षांपासून मतदारसंघात लोकसंपर्क वाढवत आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी गाव भेट दौरा केला. त्यामुळे थोरवे यांची डोकेदुखी वाढली आहे.
दरम्यान विधानसभा जागावाटपाच्या वेळी कर्जत खालापूरच्या जागेवरुन महायुतीत खटके उडण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून सहजरीत्या ही जागा सोडली जाण्याची शक्यता कमी आहे. तर राष्ट्रवादीचा या जागेवरील दावा मागे घेतला जावू शकत नाही, या जागेवर राष्ट्रवादी अडून राहण्याची शक्यता अधिक आहे. त्यातच भाजपला देखील ही जागा आपण लढवावी असे वाटत आहे. त्यामुळे या जागेवरुन महायुतीत तणाव वाढण्याची शक्यता आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत देखील थोरवेंना बारणे यांना मताधिक्य देता आले नसल्याचा दावा करत घारेंनी आमदार थोरवेंच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले.
दुसरीकडे थोरवे यांना राष्ट्रवादीसह भाजपच्या स्थानिक नेत्यांचा देखील विरोध आहे. थोरवे उमेदवार नकोत अशा तक्रारी देखील ते त्यांच्या वरिष्ठांकडे करत असल्याची चर्चा आहे. थोरवे यांचा गेल्या पाच वर्षातला एककल्ली कारभार, मतदारसंघात रखडलेला विकास, वाढती गुंडगिरी आणि गुन्हेगारी, अशामुळे थोरवे यांच्या लोकप्रियतेला धक्का बसत असल्याचे दिसून येते.