नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर; प्रदूषणावर आळा घालणारी यंत्रणा कुचकामी
| महाड | प्रतिनिधी |
महाड एमआयडीसीमध्ये गेली काही दिवसांपासून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक वायूमुळे स्थानिक नागरिकांचा जीव कोंडला आहे. रात्रीच्या सुमारास या परिसरात सर्वत्र धुराचा थर दिसून येत आहे. यामुळे दुर्गंधीयुक्त रासायनिक वायूमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.
महाड एमआयडीसीमधील कंपन्यांतून गेली काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वायू सोडला जात आहे. या वायूचा थर ठराविक उंचीपर्यंत दिसून येत आहे. औद्योगिक क्षेत्रात बहुतांश कंपन्या या रासायनिक उत्पादन करणाऱ्या आहेत. गेली अनेक वर्षांपासून या औद्योगिक क्षेत्रात प्रदूषणाचा मुद्दा कायम चर्चेत आहे. प्रदूषणामुळे परिसरातील भात शेतीचे नुकसान तर नद्यामधील पाणी दूषित झाले आहे. यावर उपाय म्हणून महाड उत्पादक संघटना आणि प्रदूषण मंडळ महाड औद्योगिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. सामायिक सांडपाणी सुविधा केंद्राच्या माध्यमातून जल शुद्धीकरण प्रकल्प चालवला जात आहे. मात्र, वायू प्रदूषणाबाबत तसा कोणताही ठोस उपाय केलेला नाही. यामुळे ऐन हिवाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये सुटणारा वायू जमिनीपासून ठराविक उंचीपर्यंत जात असल्याने नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
गेली दोन दिवस पडणाऱ्या पावसाचा फायदा घेत हवेत रासायनिक अनावश्यक वायू सोडून देण्याचे प्रकार होत आहेत. हवेत सोडलेला वायू पावसाळा आणि दमट हवामानात ठराविक उंचीपर्यंत थांबत आहे. यामुळे वातावरणात धुके असल्याचा अभास निर्माण होत आहे. या वायू प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या धुकेमय वातावरणामुळे नागरिकांना श्वसन आणि डोळ्याचा आजार होण्याची शक्यता आहे. श्वास कोंडल्यासारखा होत असून डोळे देखील चुरचुरत असल्याचे त्रास होत असल्याचा अनुभव बिरवाडी येथील स्थानिक ग्रामस्थ रेश्मा पारेख यांनी सांगितले. या वायू प्रदूषणावर आळा घालण्यासाठी बसवण्यात यंत्रणा देखील कुचकामी ठरली आहे. यामुळे हवेत कोणते घटक मिसळले आहेत याचे आकलन होत नाही. याबाबत कारवाई झाली नाही तर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये देशमुख कांबळे, नडगाव, आसनपोई, टेमघर, जिते, बिरवाडी, सवाने, आदी गावांचा समावेश आहे. या गावातील नागरिक वायू प्रदूषणामुळे हैराण झालेले आहेत. हवेमध्ये साचून राहणाऱ्या या वायूमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रात्री या परिसरातून जात असताना धुके वाटणारा वायूचा थर दिसून येतो. यामुळे दुर्गंधी, तसेच डोळे चुरचुरणे, श्वास घेण्यास त्रास होणे असे त्रास जाणवतात. यावर कारवाई होणे अपेक्षित आहे.
संतोष गोखले
स्थानिक ग्रामस्थ







