। खोपोली । प्रतिनिधी । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी हद्दीत बुधवारी (दि.26) एका अनियंत्रित ट्रेलरने साखर वाहतूक करणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात साखरेची पोती रस्त्यावर विखुरली असून, लाखो रुपयांची साखर रस्त्यावर पडल्याचे समोर आले आहे.
ट्रेलर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. धडकेनंतर साखरेचा ट्रक रस्त्यावर उलटल्याने मोठ्या प्रमाणात साखर महामार्गावर पसरली. त्यामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर पडलेली साखर हटविण्याचे तसेच वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले. अपघातात जीवितहानी किंवा जखमींबाबतची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अवजड वाहनांच्या अपघातांचे सत्र सुरूच असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या अपघातामुळे द्रुतगती मार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.