| पनवेल | वार्ताहर |
कळंबोलीत राहणाऱ्या एका 25 वर्षीय विवाहितेने पतीच्या मानसिक व शारीरिक जाचाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणातील मृत विवाहितेचा पती प्रवीण माधवराव चिता (28) याच्याविरोधात हुंडाबळीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी प्रवीण चिता हा मूळचा आंध्र प्रदेशातील असून, सध्या तो कळंबोली सेक्टर 5 ईमध्ये राहण्यास आहे. क्रेन ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या प्रवीण चिता याचा विवाह मे 2019 मध्ये ठाण्यात राहणाऱ्या रविना हिच्यासोबत झाला होता. प्रवीण व रविना या दोघांचा संसार दोन वर्षे सुरळीत चालला. मात्र, फेब्रुवारी 2021 नंतर प्रवीणला दारुचे व्यसन जडल्यानंतर त्याने रविनाला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे रविनाचा भाऊ सचिन लयशेट्टी याने तिला ठाणे येथील आपल्या घरी नेले होते. त्यावेळी प्रवीणने रविनाच्या कुटुंबियांची माफी मागून तिला पुन्हा कळंबोली येथे घरी नेले होते. मात्र, काही दिवसांनंतर प्रवीणने रविनाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तसेच तिने माहेरुन पैसे आणावेत म्हणून तिला मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे रविनाला भाऊ सचिनने 10 हजार रुपये दिले होते. त्यानंतरदेखील सचिनने प्रवीणच्या मागणीनुसार रविनाकडे 5 ते 10 हजार रुपये दिले होते. प्रवीणमध्ये सुधारणा होईल, या आशेने रविनाचे कुटुंबीय तिला पुन्हा प्रवीणच्या घरी पाठवत होते.
मात्र, त्यानंतरदेखील प्रवीणकडून रविनाचा मानसिक व शारीरिक छळ सुरुच राहिला. मंगळवार, 28 नोव्हेंबर रोजी सकाळी पुन्हा प्रवीणने रविनाला मारहाण सुरू केल्यानंतर तिने आपल्या भावाला फोन करून त्याबाबत माहिती दिली. त्यामुळे रविनाचा भाऊ व त्याचे चुलते कळंबोली येथे गेले. त्यांनी व प्रवीणचा चुलत भाऊ या सर्वांनी प्रवीणला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने त्यांच्यासमोर देखील शिवीगाळ सुरू केली. त्यामुळे सचिन व त्याचे चुलते पनवेल येथे कामानिमित्त निघून गेले. प्रवीणकडून होत असलेला शारीरिक व मानसिक छळ असह्य झाल्याने रविनाने त्याच दिवशी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर रविनाचा भाऊ सचिन लयशेट्टी याने कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.