1 मे ते 15 जूनमध्ये चालणार शिबीर; महाविद्यालयीन तरुणाकडे असणार लीडरशिप
। रायगड । सुयोग आंग्रे |
शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपूण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन स्तरावर आणण्यासाठी शाळा पातळीवर उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत.
या शिबिरांचे यशस्वी आयोजन आणि नियोजन करणायचे आदेश रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी संबंधित अधिकारी आणि शिक्षकांना दिले आहेत. अल्पकालीन, संरचित शैक्षणिक शिबिरांद्वारे विद्यार्थ्यांमधील संभाव्य शैक्षणिक तफावत भरून काढण्यास मदत होईल आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत सातत्य राखले जाऊ शकेल. या शिबिरांमुळे विद्यार्थ्यांची पायाभूत शैक्षणिक कौशल्ये अधिक सक्षम होऊन पुढील शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक तयारी होऊ शकेल, हा उद्देश आहे. एक मे, 15 जून 2025 या दरम्यान एकूण 6 आठवडे इतक्या कालावधीचे उन्हाळी शिबीर शाळा पातळीवर आयोजित करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. उन्हाळी शिबिराच्या आयोजनामध्ये स्थानिक युवक- युवती, माता गटाच्या लीडरमाता, सदस्य माता, विविध सेवाभावी संघटना, प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे सदस्य तसेच अंगणवाडी सेविका इत्यादींचा स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतला जाणार आहे. हे उन्हाळी शिबीर स्वयंसेवकांच्या सक्रिय सहभागाद्वारे राबविण्यात येणार असून, स्वयंसेवकांकडे भाषा व गणित या विषयांवर आवश्यक किमान ज्ञान, कौशल्य व आवड असणे अपेक्षित आहे. या उपक्रमांतर्गत इ. 9 वी ते 12 वी मधील इच्छुक विद्यार्थीही लिडर म्हणून सहभागी होऊ शकतात. प्रत्येक गावातून किमान 10 ते 15 विद्यार्थ्यांमागे 1 असे किमान 2 ते 3 स्वयंसेवक निवडून त्याना ‘प्रथम’ संस्थेच्यावतीने आवश्यक प्रशिक्षण, साहित्य व सातत्यपूर्ण मार्गदर्शन प्रदान करण्यात येईल. प्रत्येक गावातून किमान 2 ते 3 स्वयंसेवक यांची निवड शिक्षक व मुख्याध्यापक यांनी करावी. केंद्रप्रमुख यांनी आपल्या केंद्रातील सर्व शाळांमध्ये स्वयंसेवकांची निवड पूर्ण करून घ्यावी, असे आदेश दिले आहेत.
स्वयंसेवकांची नोंदणी
मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेकरिता निवडलेल्या स्वयंसेवकांची माहिती केंद्रप्रमुखांना द्यावी. तसेच स्वयंसेवकांच्या नोंदणीकरिता राज्यस्तरावरून लिंक देण्यात येईल. त्या लिंकमध्ये स्वयंसेवकांची नोंदणी करावी. स्वयंसेवकांना आवश्यक प्रशिक्षण साहित्य प्रथम संस्थेद्वारे दिले जाईल. तसेच सातत्यपूर्ण मार्गदर्शन प्रदान करण्यात येईल. स्वयंसेवक व निवडक मातांचे सदर शिबिराच्या अनुषंगाने ऑनलाईन व प्रत्यक्ष स्वरूपात उद्बोधन करणे आणि अंमलबजावणीसाठी प्रथम संस्थेच्या प्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे. स्वयंसेवकांना कोणत्याही प्रकारचे मानधन दिले जाणार नाही. मात्र स्वयंसेवकांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे.