गुरांच्या चार्याचाही प्रश्न ऐरणीवर
| माणगाव | वार्ताहर |
रायगड जिल्हा हा एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखला जात होता. मात्र, डोळवहाळ बंदार्यातील कालवा ठिकठिकाणी नादुरुस्त झाला आहे. शासनाकडून या कालव्याची साफसफाई करण्यासाठी पुरेशी यंत्र सामुग्री मिळत नसल्याने माणगाव तालुक्यातील शेवटच्या शेतीपर्यत पाणी पोहचत नसल्याने उन्हाळी रब्बी हंगामातील पिकाचे क्षेत्र कमी होऊन भात पीक धोक्यात येत आहे. त्यामुळे माणगाव तालुक्यातील भात पिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस घटल्याने शेतकर्यांतून कमालीची चिंता व्यक्त होत आहे.
रब्बी हंगामातील भाताचे पीक हे शाश्वत पीक म्हणून शेतकरी या मुख्य पिकाकडे मोठया प्रमाणात वळतो. मात्र, यंदाच्या वर्षी काळ प्रकल्पाच्या कालव्याला मुदतीत पाणी न सोडल्याने माणगाव तालुक्याला भाताचे कोठार म्हणून असलेली ओळख यंदाच्या वर्षी पुसट होत आहे. दिवसेंदिवस भाताचे रब्बी हंगामातील भात पिकाचे क्षेत्र घटत आहे. रायगड जिल्ह्यासाठी चिंतेची बाब आहे. यंदाचे वर्षी 120 हेक्टरवर भात लागवड केली आहे. तालुक्यातील उन्हाळी हंगामातील हजारो हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकाचे उत्पादनात कमालीची घट झाली असून यंदा भात पिकाच्या उत्पादनावर चांगलीच संक्रांत कोपली आहे. तर यंदाचे वर्षी 1350 हेक्टरवर कडधान्ये शेतकर्यांनी लावले होते.
तालुक्यातील शेतकर्यांनी यंदाचे वर्षी 120 हेक्टर म्हणजेच 300 एकरवर भात पिक लावणी होणार आहे. गेल्या पाच वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणात भात पिक घेतले जात होते. दिवसेंदिवस या क्षेत्रात घट होत असून सध्या स्थितीत कालवा पाण्यामुळे 1 हजार हेक्टर क्षेत्र पडून आहे. गेल्या वर्षी सन 2022-2023 मध्ये हेक्टरी उत्पादन 40 क्विंटल प्रमाणे 44 हजार 400 क्विंटल सरासरी उत्पन्न शेतकर्यांना मिळाले होते. गेल्यावर्षी सन 2022-23 मध्ये 98 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाच्या उत्पादनात घट होवून 38 क्विंटल उत्पादन मिळू शकले. म्हणजेच 2940 क्विंटल उत्पादन शेतकर्यांना मिळणे अपेक्षित होते. पर्यायाने तालुक्याच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम होत असून याचा फटका जिल्ह्याच्या बाजारपेठेलाही बसणार आहे. भात या मुख्य पिकाबरोबरच शेतकर्यांनी कडधान्याचे पिकही मोठ्या प्रमाणात घेतले आहे.
उन्हाळी भात पीक हे शाश्वत पीक म्हणून शेतकरी पाहतो. त्याचबरोबर गुरांच्या चार्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. व्यवसायाला पूरक नगदी पीक म्हणून कलिंगड मोठ्या प्रमाणात पिकवले आहे. भाताची ओळख माणगावची पुसट होत असली तरी कडधान्य आणि कलिंगडाच्या विक्रमी उत्पादनातून ती ओळख गडद होत आहे. रब्बी भाताचे क्षेत्र वाढवण्यासाठी शासनांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.







