उन्हाळी रानफुला-फळांना बहर

निसर्गप्रेमींचा आकर्षणाचा विषय; खवय्ये घेतात रान फळांचा आस्वाद

| माणगाव । वार्ताहर ।

वसंत ऋतूला सुरूवात झाली आहे. उन्हाचा पारा चढत असताना रानावनात मात्र उन्हाळी रानफुलांचा, फळांचा बहर सुरु झाला आहे. उन्हाळ्यात जंगलात विविध प्रकारची फुले, फळे बहरून येतात. चैत्र महिन्यात झाडांना पालवी फुटली असून या पालवीतच बहावा, निवडुंग, गुलमोहर, पळस, चाफा, सावर इत्यादी झाडांची फुले तर आंबा, काजू, फणस, बोरे, टेंभुर्णी इत्यादी रान फळांची झाडे बहरली आहेत. वृक्षांना मोठ्या प्रमाणात फुलांचा, फळांचा बहर आला आहे. रानावनात झाडांना पालवी बरोबरच आलेला हा बहर निसर्गप्रेमी, पर्यटक यांच्या आकर्षणाचा विषय होत असून निसर्गातील उन्हाळ्याच्या काहिलीत बहरणारी रानफुले, रानफळे निसर्गाची शोभा वाढवित आहेत.

उन्हाळा हा काहीसा उदासवाना ऋतू असतो. झाडांची पानगळ, उन्हाची वाढणारी काहीली व भकास वाटणारे रान असे काहीसे चित्र सर्वत्र दिसते. मात्र याच ऋतूत रानातील अनेक फळ झाडे, फुल झाडे फुलून येतात यामुळें उन्हाळ्याच्या दिवसात रानाची शोभा वाढत असून रानावनात झाडांना उन्हाळी रान फुलांचा बहर आलेला दिसत आहे.

कोकणातील सह्याद्री पर्वताची कडे कपारीत, रस्त्यांच्या दुतर्फा, शेत शिवारात असंख्य प्रकारच्या फळ, फुल झाडांना पालवी बरोबरच फुलांचे गुच्छ, फळ आले आहेत. एरवी उन्हाळा रुक्ष उदास वाटतो मात्र रानावनात फुलणार्‍या उन्हाळी रान फुलांनी, फळांनी निसर्ग उन्हाळ्यातही आपली शोभा कायम ठेऊन सुंदरता कायम ठेवत असल्याचे निसर्गप्रेमी, पर्यटक समाधान व्यक्त करीत आहेत. खवय्यांनाही या रान फळांनी आनंद मिळतो आहे.
उन्हाळी रानफुले :- बहावा, निवडुंग, गुलमोहर, पळस, चाफा, सावर इ .
उन्हाळी रानफळे :- आंबा, काजू, फणस, बोरे, टेंभुर्णी, करवंद, अटूर्णी, कोकम, रांजण, जांभूळ, मंदुकली इ.

रान फळे खाण्यासाठी तसेच विविध प्रकारची लोणची व स्वयंपाकात विविध प्रकारच्या चटण्या, खाद्य पदार्थ बनविण्यासाठी उपयोग केला जातो.

मंजुळा पडवळ, गृहिणी

उन्हाळा वाढत असताना रानात असंख्य प्रकारच्या झाडा-वेलीना फुलांचा बहर आला आहे. अनेक प्रकारची फळे आली आहेत. ही फुले पाहणे व फळांचा आस्वाद घेणे आनंददायी असते. रानात बहरलेली ही फुले पाहणे अतिशय आनंदाचे आहे. ही फुले ऐन उन्हाळ्यात फुलतात. या नंतर काही दिवसांनी पावसाळा सुरू होईल. पावसाळा जवळ आल्याचे उन्हाळी रान फुले संकेत देतात.

विलास देगावकर, निसर्गप्रेमी, माणगाव.
Exit mobile version