बारामतीत सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी विजयी

। पुणे । प्रतिनिधी ।

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी विक्रमी कामगिरी करत माजी आमदार अजित पवार यांच्या 2019 मधील मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला आहे. मतमोजणीच्या 20व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना तब्बल 1 लाख 89 हजार मतांची आघाडी मिळवत विजय संपादीत केला. 2019 मध्ये अजित पवार यांना मिळालेल्या 1 लाख 65 हजार मताधिक्याला त्यांनी मागे टाकले आहे.

बारामती मतदारसंघातील यापूर्वीची निवडणूक आकडेवारी पाहता, गेल्या अनेक वर्षांपासून येथे अजित पवार यांचे वर्चस्व राहिले आहे. 2019च्या निवडणुकीत अजित पवार यांनी 70 टक्के मतदानात1 लाख 95हजार 641 मते मिळवत 1 लाख 65 हजार 265मताधिक्याचा विक्रम केला होता. त्याआधी 2014मध्ये त्यांनी1 लाख 50 हजार 588 मते मिळवत 89 हजार 791मताधिक्य मिळवले होते, तर 2009मध्ये 68टक्के मतदानात 1 लाख 28 हजार 544मते मिळवत 1 लाख 2 हजार 797 मताधिक्य नोंदवले होते. 2024मधील परिस्थितीतही बारामतीत मोठे मतदान झाले होते. त्या वेळी 71.86 टक्के मतदानाची नोंद झाली असून अजित पवार यांनी 1 लाख 81हजार 132मते मिळवत 1 लाख 1हजार मताधिक्याने विजय मिळवला होता.

या पार्श्वभूमीवर, पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी घेतलेली 1 लाख 68 हजारांची आघाडी ही केवळ विजय नाही, तर बारामतीच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. निकालाचा कल एकतर्फी दिसून येत आहे. या निवडणुकीत एकूण 2 लाख 23 हजार 705 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विक्रमी मताधिक्य मिळवण्यासाठी किमान 1 लाख 23 हजार 265 मते आवश्यक असताना, सुनेत्रा पवार यांनी हा टप्पा सहज पार करत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. दरम्यान, विजयाचा जल्लोष साजरा करू नये, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. “आजचा निकाल जाहीर होत असताना दादांच्या आठवणींनी आपण सर्वजण भावूक आहोत. त्यामुळे कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. संयम राखत दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया,” अशी विनंती त्यांनी केली.

Exit mobile version