मर्क्युरी, सट्रन बाद फेरीत
| मुंबई | प्रतिनिधी |
मर्क्युरी प्लॅनेट, सट्रन प्लॅनेट यांनी सचिंद्र आयरे फाऊंडेशन आयोजित मास्टर्स सुपर लीग शालेय कबड्डी स्पर्धेत बाद फेरीतील आपला प्रवेश निश्रि्चत केला. आज झालेल्या सामन्यात मर्क्युरी प्लॅनेटने 2 सामन्यात विजय मिळवीत बाद फेरी गाठली. प्रथम मर्क्युरीने ज्युपिटर प्लॅनेटचा 66-37 असा धुव्वा उडवीत पराभव केला. तर त्यानंतर झालेल्या सामन्यात त्यांनी नेपच्यून प्लॅनेटचा 64-45 असा पराभव केला. राज गुप्ता, मयांक ढोणे यांनी या दोन्ही सामन्यात धुव्वादार खेळ करीत मर्क्युरी प्लॅनेटच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला.
सट्रन प्लॅनेटने बाद फेरी गाठताना व्हीनस प्लॅनेटवर 70-30 असा मोठ्या फरकाने दुसर्या विजयाची नोंद केली. या विजया बरोबरच त्यांनी बाद फेरीतील आपला मार्ग सुकर केला. नरेश घाडगे, नवनीत भिसे या विजयाचे शिल्पकार ठरले. व्हीनस प्लॅनेटचा साई कोपकर एकाकी लढला. अर्थ प्लॅनेटने युरेनस प्लॅनेटला 54-34 असे नमवित पहिल्या विजयाची नोंद केली. पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागलेल्या अर्थ प्लॅनेटच्या या विजयाने बाद फेरी गाठण्याच्या आशा पल्लवित झाल्या. विवेक पोखरकर अर्थ प्लॅनेट कडून, तर नितीन दिव्यांशु युरेनस प्लॅनेट कडून उत्कृष्ट खेळले. मार्स प्लॅनेटने चुरशीच्या लढतीत ज्युपिटर प्लॅनेटला 53-52 असे चकवीत पहिल्या विजयाची नोंद केली. पूर्वार्धात 26-21 अशी आघाडी घेणार्या मार्स प्लॅनेटला उत्तरार्धात ज्युपिटर प्लॅनेटने कडवी लढत दिली. रितेक मेस्त्री, दुर्गेश यादव यांच्या संयमी व धूर्त खेळीला या विजयाचे श्रेय जाते. स्वरूप वायदंडे, रणवीर सिंग यांचा झंजावाती खेळ ज्युपिटर प्लॅनेटचा पराभव टाळू शकला नाही.