। रायगड । क्रीडा प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा हा संपुर्ण विश्वात टेनिसबॉल क्रिकेटसाठी खूप प्रसिद्ध आहे. गेल्यावर्षी एका सर्वेनुसार रायगड जिल्ह्यात लहान मोठ्या जवळपास 2 हजार टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. करोडो रुपयांची उलाढाल या टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातुन जिल्ह्यात दरवर्षी होत असते. याच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रायगड जिल्ह्यासह परदेशातसुद्धा नावलौकिक असलेला पनवेल तालुक्यातील वहाळ गावचा सुपरस्टार खेळाडू ऋषिकेश कुमार नाईक यांने खारघर येथे झालेल्या रायगड प्रीमिअर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या वेळी आपली निवृत्ती जाहीर केली आहे.
ऋषी नाईक (37) हा सिव्हिल इंजिनिअर उच्चशिक्षित खेळाडू असून सिडकोमध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहे. आपल्या तडाखेबंद फलंदाजीमुळे सर्वत्र प्रसिद्ध असणार्या ऋषी नाईक याने आतापर्यंत अनेक स्पर्धेत सामनावीर, उत्कृष्ठ फलंदाज व मलिकावीराचे पन्नासपेक्षा जास्त किताब पटकावले आहेत. त्याच्या नावावर आतापर्यंत 4 दुचाकी व मालिकावीराची पारितोषिके आहेत. आपल्या वहाळ गावच्या व व्यावसायिक संघासाठी त्यांनी 22 वर्ष योगदान दिले आहे.
निवृत्ती जाहीर केल्यानंतर माध्यमांशी बोलताना ऋषी नाईक खूप भाऊक झाला होता. त्याने सर्व सहखेळाडू, प्रेक्षक, हितचिंतकांनी दिलेल्या आजवरच्या प्रेमाबद्दल आभार मानले. या पुढे आपण फक्त व्यवसायिक लेदर बॉल क्रिकेट खेळणार असून आपले योगदान रायगड जिल्हा क्रिकेट असो.च्या युवा व होतकरू खेळाडूंसाठी देणार असल्याचे नाईक याने सांगितले आहे.