महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या निवडणूकीत सुप्रिया पाटील विजयी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
दि. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीत अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया जयंत पाटील यांना सर्वाधिक मते मिळाल्याने त्या विजयी झाल्या आहेत. यापूर्वी 21 पैकी दहा संचालक बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित जागांसाठी मतदान घेण्यात आले. सन 2022-23 ते 2026-27 या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक घेण्यात आली. मतदान प्रक्रिया 22 नोव्हेंबरला झाल्यानंतर बुधवारी (दि.23) मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला.

सुप्रिया पाटील या अलिबाग अर्बन बँकेच्या चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांनी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून देखील जबाबदारी पार पाडली आहे. त्यांची निवड जाहीर होताच त्यांच्यावर रायगड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.अ- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मतदारसंघातील मुंबई-कोकण विभागातून सिद्धार्थ कांबळे, पुणे विभागातून दिगंबर दुर्गाडे, नाशिक विभागातून गुलाबराव देवकर, औरंगाबाद विभागातून अर्जुनराव गाढे आणि अमरावती विभागातून वसंत घुईखेडकर बिनविरोध निवडून आले आहेत.

ब-नागरी सहकारी बँक मतदारसंघातून पुणे विभागातून सुभाष जोशी आणि भाऊ कड, नागपूर विभागातून रवींद्र दुरगकर, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून संजय भेंडे, तर अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून विश्‍वास ठाकूर बिनविरोध निवडून आले.असोसिएशनच्या संचालक मंडळात मुंबई व कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती या विभागातून अ-जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सहा प्रतिनिधी असतात. त्यापैकी मुंबई व कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती विभागातून संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे, तर नागपूर विभागातील एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात होते.

ब-नागरी सहकारी बँकांचे मुंबई व कोकण विभाग, पुणे, नाशिक, औरंगाबाद विभागातून प्रत्येकी दोन, तर नागपूर आणि अमरावती विभागातून प्रत्येकी एक प्रतिनिधी संचालक असतो. त्यापैकी पुणे विभागातील दोन, तर नागपूर विभागातील एक संचालक बिनविरोध झाले आहेत.महिला प्रतिनिधींच्या दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात होत्या. तर भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गातील एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आपले नशीब आजमावत होते.

या मतमोजणीत सुप्रिया पाटील यांना सर्वाधिक मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. असोसिएशनकडून गुंतवणूक, वसुली आणि विविध कायदे, माहिती तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा व्यवस्थापन, समाजमाध्यमांतून विपणन, बँकिंग नियमन कायद्यातील बदलामुळे सहकारी बँकिंग क्षेत्रावर होणारे परिणाम, मानवी संसाधने आदी विषयांवर राज्यातील जिल्हा व नागरी बँकांना प्रशिक्षण देण्यात येते. तसेच शिक्षण, सल्ला, डिजिटल पेमेंट्स, संशोधन व नियोजन, धोरण, जाहिरात व प्रसिद्धी अशा विविध सेवा बँकिंग क्षेत्रातील संस्थांना दिल्या जातात. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रशांत सातपुते यांनी काम पाहिले.

Exit mobile version