| अलिबाग | प्रतिनिधी |
प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्या, स्थानक स्वच्छ राहवे यासाठी एसटी महामंडळाच्या सर्व एसटी बस स्थानकांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक’ या अभियानाद्वारे हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रवाशांना एसटी महामंडळाकडून चांगल्या सेवा देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. स्थानक स्वच्छ ठेवणाऱ्या स्थानकांना एसटी महामंडळाकडून बक्षीस दिले जाणार आहे. त्यातून स्वच्छतेची सवय लावण्याबरोबरच परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परीक्षेत उतीर्ण झालेल्या स्थानकांना बक्षीस दिले जाणार आहे. दरम्यान, संभाजीनगरच्या प्रादेशिक व्यवस्थापक विभाग नियंत्रक अनघा बारटक्के, प्रादेशिक सांख्यिकी अधिकारी अनिता कोकाटे, अलिबाग एसटी बस आगाराचे व्यवस्थापक चेतन देवधर, एसटी प्रेमी यांच्या देखरेखेखाली अलिबाग एसटी बस आगारासह स्थानकाची पाहणी करण्यात आली. त्यांनी स्थानकातील स्वच्छता, गाड्यांची अवस्था, कार्यालयीन कामकाज, कर्मचाऱ्यांचे राहणीमान व कार्यालयीन व्यवस्थापन अशा सर्वच बाबींची माहिती प्रत्यक्ष भेटून घेतली. काही प्रवाशांसोबत संवाद साधून त्यांच्याकडून अभिप्राय घेण्यात आला.