28 हजारहून अधिक हेक्टर क्षेत्रात घट
| अलिबाग | प्रतिनिधी |
वाढते औद्योगिकरण, शेतमजुरांची कमतरता आणि भातशेतीतून मिळणारे अत्यल्प उत्पन्न अशा अनेक कारणांमुळे लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे. 1 लाख 24 हजारचे उत्पन्न असणारे भाताचे क्षेत्र आता 95 हजार 645 हेक्टर इतके आहे. त्यामुळे 28 हजारहून अधिक हेक्टर भाताचे क्षेत्र काही वर्षात कमी झाल्याचे चित्र आकडेवारीनुसार दिसून आले आहे. जिल्ह्यातील शेतीवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे.
रायगड जिल्हा मुंबईला अगदी जवळ असलेला जिल्हा म्हणून ओळखला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण होत आहे. पूर्वी भाताचे कोठार म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आता औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखण्याच्या वाटेवर आहे. यावर्षी 81 हजार 335 हेक्टरवर भात पिकाच्या लागवडीचे उद्दीष्ट कृषी विभागाने ठेवले आहे. त्यावरून लागवडी खालील क्षेत्रात आणखीन घट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतजमिनी उद्योगांच्या नावाखाली संपादित केल्या जात आहेत. सेझ, नवी मुंबई विमानतळ, दिल्ली-मुंबई कॉरीडोर, जेएऩपीटी, टाटा पॉवर या सारख्या प्रकल्पासाठी सध्या भुसंपादन सुरु आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी 450 हेक्टर, मुंबई ट्रान्स हार्बर लिंकसाठी 28 हेक्टर, दिल्ली-मुंबई कॉरीडोरसाठी 4 हजार हेक्टर, डेडीकेटेड फ्रिट कॉरीडोरसाठी 10 हेक्टर, बाळगंगा धरण प्रकल्पासाठी 1 हजार 213 हेक्टर, खालापुर औद्योगीक क्षेत्र टप्पा 2 साठी 9 हेक्टर, तर टप्पा तीनसाठी 2 हेक्टर, नवीमुंबई विमानतळासाठी 684 हेक्टर, रेल्वे मार्ग दुपदरीकरणासाठी 31 हेक्टर, वडोदरा-मुंबई दृतगर्ती मार्गासाठी 318 हेक्टर, पुणे-दिघी रस्त्यासाठी 4 हेक्टर भुसंपादन केले जात आहे. अलिबाग तालुक्यात टाटा पॉवरसाठी, रिलायन्स आणि जेएसडब्ल्यू कंपन्यासाठी पेण तालुक्यात जागा खरेदी करण्यात आल्या आहेत.
त्याचबरोबर सिडकोच्या माध्यमातून अलिबाग, रोहा आणि मुरुड तालुक्यातील 44 गावांत एकात्मिक औद्योगिक विकास प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 19 हजार हेक्टर शेतजमिनी संपादीत करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि शेती मात्र उद्ध्वस्त होत चालली आहे. उरण, पनवेल, खालापूर, पेण, अलिबाग या तालुक्यात लागवडीखालील क्षेत्रात मोठी घट होत आहे. ही घट कमी करण्यासाठी नाचणी व भात पिक लागवड करण्यावर कृषी विभाग प्रयत्न करीत आहे. परंतु, वाढत्या औद्योगिकीकरणामुळे या पिकत्या जमीनी नष्ट होत असल्याचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे.
खाऱ्या पाण्यामुळे जमीनी नापिक
जिल्ह्यात खारभूमी क्षेत्रात येणारे 31 हजार 296 हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील अलिबाग तालुक्यातील 3 हजारहून अधिक हेक्टर क्षेत्र खाड्यांमधील उधाणाचे पाणी शिरून कायमचे नापिक झाले आहे. भाताचे उत्पादन निघणाऱ्या शेत जमीनीत कांदळवने तयार झाली आहेत. समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून शेतजमिनींचे संरक्षण व्हावे यासाठी खाडी आणि समुद्र किनाऱ्यांवर खारबंदीस्ती घातली जाते. मात्र, खारभूमी विभागाकडून त्यांची योग्य देखभाल दुरूस्ती केली जात नाही. त्यामुळे बंधारे फुटून खारे पाणी शेतात शिरते, आणि या जमिनी नापिक होत असल्याचे चित्र आहे. मागील काही वर्षात 1 लाख 24 हजार हेक्टर असणारे क्षेत्र आता95 हजारपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे शेतीच्या क्षेत्रात अमुलाग्र घट झाल्याचे दिसून येत आहे.