| पाली | वार्ताहर |
रायगड जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत मंगळवारी (दि.20) महाराष्ट्र पशुसंवर्धन दिनानिमित्त विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार समारंभ कार्यक्रम जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या उपस्थितीत वरसोली येथे पार पडला.
यावेळी बोलताना सत्यजित बडे यांनी सत्कार करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना त्यांना जिल्हास्तरावर भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटना व पशु चिकित्सा व्यवसायी संघटनेच्या रायगड शाखेने जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे केली होती.
यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे, जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ.रत्नाकर काळे, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. अजय कांबळे, महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटना जिल्हा अध्यक्ष डॉ. मुकेश मर्चंडे, पशु चिकित्सा व्यवसायी संघटना महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष कैलास चौलकर यांच्यासह पशुसंवर्धन विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.