तिसऱ्या सामन्यानंतर होणार चित्र स्पष्ट
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीवरून सध्या खूप रस्सीखेच सुरूच आहे. अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समिती विश्वचषक संघाची घोषणा पुढील महिन्यात करण्याची शक्यता आहे. त्याआधी भारताचा वेस्ट इंडीजविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामनाही प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्माला योग्य संघ निवडण्याची शेवटची संधी आहे. सूर्यकुमार आणि संजू सॅमसनचे संघातील स्थान हे त्यांच्या शेवटच्या सामन्यातील कामगिरीवर अवलंबून असणार आहे.
रोहित आणि विराटच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांना संधी देण्यात आली होती, पण दोघेही सपशेल अपयशी ठरले. विश्वचषक स्पर्धेला फक्त दोन महिने उरले आहेत. यापूर्वी भारताला जास्तीत जास्त 10 एकदिवसीय सामने खेळता येणार आहेत. असे असूनही भारताची तयारी अपूर्ण असल्याचे दिसत आहे. अजूनही खेळाडूंना अजमावण्याचा टप्पा सुरू आहे. फलंदाजी क्रमवारीत प्रयोग केले जात आहेत. संघात कोणत्या 15 किंवा 16 खेळाडूंना संधी मिळेल याची कोणतीही ब्ल्यू प्रिंट नाही आणि अद्यापही हे ठरलेलेही नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सध्याच्या एकदिवसीय मालिकेत प्रशिक्षक राहुल द्रविड केवळ नव्या खेळाडूंनाच अजमावत आहेत.
संघातील स्थान धोक्यात?
सूर्यकुमार यादवला पुन्हा एकदा मोठी खेळी खेळता आली नाही. जोखीम घेणे हा सूर्याचा नैसर्गिक खेळ आहे, पण असा खेळ करून त्याने विश्वचषक स्पर्धेतील स्वतःची दावेदारी कमकुवत केली आहे. त्याला एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या फलंदाजी तंत्रात बदल करण्याची गरज आहे. संजू सॅमसनबद्दल काही सांगता येत नाही. कारण, त्यानेही सुवर्णसंधी गमावली आहे.