भारतीय संघासाठी खेळणार सूर्यवंशी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर आता आयपीएलच्या 19 व्या मोसमाकडे चाहत्यांचं लक्ष आहे. या स्पर्धेला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर ही स्पर्धा जवळपास मे महिन्यातील शेवटपर्यंत खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर भारतीय संघ ॲक्शन मोडमध्ये येणार आहे. भारतीय संघ जून महिन्यापासून अनेक द्विपक्षीय मालिका खेळायच्या आहेत. त्यामुळे भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना पहिल्यांदाच संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंडर 19 टीम इंडियातील फलंदाज वैभव सूर्यवंशी याने भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यात प्रमुख भूमिका बजावली होती. त्यामुळे वैभवला सिनिअर टीम इंडियात संधी मिळणार असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे.

भारतीय संघ टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर आपली पहिली आंतरराष्ट्रीय मालिका मायदेशात अफगाणिस्तान विरुद्ध्‌‍‍ खेळणार आहे. भारतीय संघ अफगाणिस्तान विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर उभयसंघात फक्त 1 कसोटी सामना होणार आहे. उभयसंघातील हे एकूण 4 सामने 6 ते 20 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहेत. अफगाणिस्तान विरूद्धच्या मायदेशातील एकदिवसीय मालिका आणि कसोटी सामन्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यात 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. तर त्यानंतर उभयसंघात 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. उभयसंघात 1 ते 19 जुलै दरम्यान या दोन्ही मालिका खेळवण्यात येणार आहेत.

भारतीय संघाच्या मालिकांचा सपाटा हा ऑक्टोबरपर्यंत सुरुच असणार आहे. भारतीय संघ विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात ऑक्टोबरमध्ये एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका नियोजित आहे. तसेच बांगलादेश विरूद्धच्या स्थगित मालिकेबाबतही निर्णय होऊ शकतो. त्यामुळे या अशा सातत्याने होणाऱ्या मालिकांमुळे भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे.

Exit mobile version