। पुणे । प्रतिनिधी ।
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग आणावा, असा प्रस्ताव भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी अधिवेशनात मांडला. यावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सभागृहाला खोटी माहिती देणार्या मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार आहेत का? असा सवाल करत सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात प्रवीण दरेकर यांनी जो काही माझ्यावर हक्कभंग आणला आहे. त्याबाबत मी असे कोणते कृत्य केले आहे. तसेच, मी कोणाला 56 जण पायाला बांधून फिरण्याची भाषा केली आहे का? किंवा कोणाचाही एकेरी उल्लेख केला आहे का? किंवा कुठल्याही सभागृहाच्या सदस्याला शिवीगाळ केली आहे का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, जर माझ्यावर आपण हक्कभंग आणत असाल तर सभागृहात विवस्त्र हातवारे करणार्यांवर हक्कभंग कधी आणणार? तसेच, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सभागृहाला खोटी माहिती देणार्या आणि वारंवार खोटी माहिती देणार्या मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार का? अशी जोरदार टीका सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर केली आहे.