सिडकोच्या जलकुंभातून पाणी विक्रीचा संशय

| पनवेल | प्रतिनिधी |

खारघर सेक्टर 27 येथील सिडकोच्या जलकुंभातून टेम्पोद्वारे पाणी भरून त्याची खासगीरीत्या विक्री केली जात असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. या ठिकाणाहून एका टेम्पोतून सुमारे 500 ते 1,000 लिटर पाणी भरून नेले जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या प्रकाराची सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने चौकशी करून अनधिकृत पाणी विक्री होत असल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.

खारघरमधील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. काही सोसायट्यांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत सिडकोच्या जलकुंभातून पाणी भरून त्याची खासगी विक्री होत असल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

सिडकोच्या जलकुंभातून टेम्पोद्वारे पाणी भरण्यास कोणाला अधिकृत परवानगी देण्यात आली आहे का, तसेच या पाण्याचा वापर आणि विक्री नियमानुसार केली जात आहे का, याची पडताळणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. संबंधित जलकुंभाची नियमित तपासणी करून पाणीपुरवठा व्यवस्थेतील संभाव्य गैरप्रकार रोखावेत, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणाची सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी. तसेच खारघरमधील नागरिकांना पुरेशा दाबाने आणि सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

Exit mobile version