सागाव येथे तरुणाचा संशयास्पद मृत्यू; घात की अपघात ?

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
तालुक्यातील कावाडे येथून पनवेल तळोजा येथे निघालेल्या २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह सांयकाळी ५ च्या सुमारास आढलल्याने खळबळ उडाली आहे. हा घात आहे की अपघात या चर्चेला उधाण आले आहे.


नीरज मधुकर पाटील ( 25) असे या तरुणाचे नाव आहे. पनवेल तालुक्यातील तळोजा येथील कंपनीत सकाळी ७ वाजता जायचे असल्याने पहाटे पाच वाजता तो आपल्या कावाडे येथील घरातून निघाला होता. मात्र सांयकाळपर्यंत घरी परत न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होत नसल्याने त्याच्या कंपनीत चौकशी केली असता तो आज कामावरच आला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कावाडे परिसरात त्याचा शोध घेवूनही त्याचा काही पत्ता सापडला नाही. सायंकाळी ५ च्या सुमारास सोगाव येथील पुलाजवळ त्याची मोटारसायकल सापडल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांच्या मदतीने सोगाव जवळ शोध घेण्यास सुरूवात केली असता त्याचा मृतदेह पुलाखाली पडला असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने नातेवाईकांनी सदर मृतदेह अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला. या घटनेची नोंद अलिबाग पोलीस ठाण्यात करण्याचे काम उशिरा पर्यंत सुरू होते.

दरम्यान, कावाडे येथून तळोजा येथे निघालेल्या निरजचा मृतदेह सोगाव येथे आढलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे हा अपघात आहे की घात आहे याबाबत नातेवाईक शंका व्यक्त करीत आहेत.

Exit mobile version