गांधी जयंतीपर्यत रायगडात स्वच्छता सेवा अभियान

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या वतीने शासनाच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार 15 सप्टेंबरपासून जिल्ह्यात स्वच्छता सेवा अभियाना अंतर्गत गावे स्वच्छ, सुंदर करण्यावर भर दिला जात आहे. हे अभियान 2 ऑक्टोंबर पर्यंत राबविण्यात येणार आहे. अभियान कालावधीत महाश्रमदान, शोषखड्डे, वृक्षलागवड, प्लास्टिक बंदी शपथ यासह इतर उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी दिली आहे.

स्वच्छता सेवा अभियान अंतर्गत 22 सप्टेंबर रोजी कचरा व्यवस्थापनासाठी शेड, कंपोस्ट खड्डे उभारणे, परिसर स्वच्छता करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. तर 23 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, घोषवाक्य लेखन स्पर्धा, स्वच्छता प्रतिज्ञा व भिंतींवर स्वच्छता संदेश लेखन करण्यात येईल. तसेच 24 सप्टेंबर रोजी अंगणवाडी परिसरात पालक व ग्रामस्थांच्या मदतीने स्वच्छता श्रमदान मोहीम राबविण्यात येईल.

25 सप्टेंबर रोजी डंपिंग ग्राउंड क्षेत्रात कचर्‍याचे कम्पोस्टिंग साग्रीकेशन, ग्रान्डफिल्ड करण्यात येईल. 26 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छ्ता मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच 27 ते 30 सप्टेंबर दरम्यान ग्रामपंचायतींनी सिंगल युज प्लास्टिक बंदी ठराव घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

28 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील 75 आदर्श ग्रामपंचायतींच्या सरपंचांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. 29 सप्टेंबर रोजी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांच्या परिसर स्वच्छता व वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात येईल. 30 सप्टेंबर रोजी गावातील धार्मिक स्थळे, समाजमंदिर, रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तर 2 ऑक्टोंबर रोजी स्वच्छ भारत दिनानिमित्त महाश्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत गावे स्वच्छ सुंदर होण्यास मदत होणार आहे. या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, स्वयं सहाय्यता बचत गट, स्वयंसेवी संस्था, नागरिक, विद्यार्थी या सर्वांचा सहभाग घेण्यात यावा.

डॉ. किरण पाटील,सीईओ,रायगड जि.प.
Exit mobile version