बापरे! दात घासता घासता टूथब्रशच गिळला

शस्त्रक्रियेविना डॉक्टरांनी पोटातून काढला बाहेर!
रिक्षाचालकावर मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार

। पनवेल । प्रतिनिधी ।

दात घासताना चुकून संपूर्ण टूथब्रश गिळल्याने पेण येथील 50 वर्षीय रिक्षाचालकाला रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र, नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सुमारे 30 मिनिटांच्या आव्हानात्मक एंडोस्कोपी प्रक्रियेद्वारे कोणतीही शस्त्रक्रिया न करता पोटात अडकलेला 19 सेंटीमीटर लांबीचा टूथब्रश यशस्वीपणे बाहेर काढला. उपचारानंतर काही तासांतच रुग्णाला घरी सोडण्यात आले.

पेण येथील रहिवासी आणि शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेले रिक्षाचालक राजेंद्र माळुसरे हे नेहमीप्रमाणे सकाळी दात घासत असताना चुकून त्यांच्या तोंडातून टूथब्रश पोटात गेला. त्यांनी सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतले. एक्स-रेमध्ये टूथब्रश दिसून न आल्याने त्यांना पुढील तपासणीसाठी नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. तेथे एंडोस्कोपी केल्यानंतर संपूर्ण टूथब्रश पोटात अडकल्याचे स्पष्ट झाले.

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, हेपॅटोलॉजिस्ट आणि थेरप्युटिक एंडोस्कोपिस्ट डॉ. रावसाहेब राठोड यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने ही प्रक्रिया पार पाडली. टूथब्रश लांब आणि कठीण असल्याने तो अन्ननलिकेच्या नैसर्गिक वळणांमधून सुरक्षितपणे बाहेर काढणे आव्हानात्मक होते. विशेष उपकरणांच्या साहाय्याने आणि रुग्णाच्या शरीराची स्थिती बदलून डॉक्टरांनी प्रयत्न केले. अखेर कोणतीही शस्त्रक्रिया न करता टूथब्रश तोंडावाटे बाहेर काढण्यात यश आले. यानंतर पुन्हा एंडोस्कोपी करून अन्ननलिकेला कोणतीही दुखापत झाली नसल्याची खात्री करण्यात आली. काही काळ निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

डॉक्टरांनी सांगितले की, चुकून टूथब्रश किंवा अन्य मोठी वस्तू गिळल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. उलटी करण्याचा प्रयत्न करू नये किंवा अन्नाच्या मदतीने वस्तू खाली ढकलू नये. अशा प्रकारांमध्ये वेळीच निदान आणि उपचार केल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते.

उपचारानंतर राजेंद्र माळुसरे यांनी डॉक्टर आणि वैद्यकीय पथकाचे आभार मानले. रुग्णालयाचे प्रादेशिक संचालक नीरज लाल आणि सेंटर हेड संदीप जोशी यांनीही या यशस्वी उपचार प्रक्रियेबद्दल वैद्यकीय पथकाचे कौतुक केले.

Exit mobile version