| पनवेल | वार्ताहर |
पनवेल महापालिकेच्या वैद्यकीय विभागात कामावर जाणाऱ्या एका वॉर्डबॉयचा अपघाती मृत्यू झाला आहे. नेमका अपघात कशामुळे झाला, त्याचा शोध खारघर पोलीस घेत आहेत. या अपघातामधील मृत वॉर्डबॉयचे नाव राहुल रमेश उलवेकर (34) असे आहे. तो नावडे गावातील रहिवासी आहे. मागील अनेक महिन्यांपासून तो महापालिकेच्या दवाखान्यात वॉर्डबॉयचे काम करत होता. सकाळी राहुल हे नावडे येथून दुचाकीवरुन महापालिकेच्या ओवे गावातील वैद्यकीय नागरी आरोग्य केंद्रावर जात असताना त्यांचा अपघात झाला. अपघाताचे नेमके कारण पोलिसांना समजू शकले नाही. रमेश यांची दुचाकी अचानक फरफटत गेली. त्यामध्ये राहुल यांच्या डोक्यावर जबर मार लागला. त्याच रस्त्याने जाणाऱ्या एका रिक्षाचालकाने मदत करुन त्यांना रुग्णालयात दाखल केले. जखमी अवस्थेत राहुल यांना मेडिकव्हर या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तेथील डॉक्टरांनी तपासल्यावर राहुल यांना मृत घोषित केले.