। बंगळूरू । वृत्तसंस्था ।
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने इंडियन प्रीमीयर लीग 2024 मध्ये शानदार पुनरागमन करत प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. बंगळुरूच्या या पुनरागमनात अनेक क्रिकेटपटूंचा मोलाचा वाटा राहिला, ज्यात स्वप्नील सिंगचाही समावेश आहे.
स्वप्नीलला सुरुवातीच्या 8 सामन्यात बंगळुरूने संधी दिली नव्हती. पण नवव्या सामन्यापासून तो बंगळुरूकडून खेळला, विशेषत:तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून योगदान देताना दिसला. त्याने गोलंदाजीबरोबरच फलंदाजीही योगदान दिले. स्वप्नीलचे नाव देशांतर्गत क्रिकेटमध्ये नेहमीच चर्चेत असते. त्याला 2008 मध्येच मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये निवडलेही होते. परंतु, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. यानंतर त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्यासाठी 2016 सालाची वाट पाहावी लागली. त्याने पंजाब किंग्सकडून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पदार्पण केले. त्याने पंजाब किंग्सकडून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पदार्पण केले. पण त्यात त्याला खास काही करता आले नाही. त्यानंतर त्याला संधी मिळाली ती लखनौ सुपर जायंट्सकडून 2023 मध्ये त्यावेळी अँडी फ्लॉवर प्रशिक्षक होते. पण 2024 मध्ये फ्लॉवर यांनी बंगळुरूचे प्रशिक्षकपद स्विकारले. यावेळी स्वप्नीलने त्यांना प्री-सिजन ट्रायल कँम्पमध्ये एक शेवटची संधी देण्याची विनंती केली होती.
अखेर स्वप्निलला बंगळुरूने लिलावात शेवटी 20 लाखांच्या मुळ किंमतीत संघात घेतले. त्याच्या या संपूर्ण प्रवासाबाबात स्वप्निलने भाष्य केले आहे. याचा व्हिडिओही बंगळुरूने सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान, त्याने सांगितले की जर त्याला या हंगामात संधी मिळाली नसती, तर त्याने क्रिकेट सोडण्याचा विचार केला होता. तो त्याच्या प्रवासाबद्दल सांगत असताना भावूकही झाला होता.